Tuesday, June 16, 2009

आळस, शिस्त, रस आणि कॉन्स्टिट्यूशन

14 प्रतिक्रिया
जे अवघड आहे ते नेटाने करायला पाहिजे. ते करताना कंटाळा, आळस, वैताग, त्रास, रागराग होईल - पण मिल्ट्री ट्रेनिंगमध्ये ट्रेनर जसा कॅडेट्स कडून निष्ठूरपणे सराव करून घेतो तसं स्वत:ला ट्रीट केलं पाहिजे. जे सोप्पं आहे ते करण्याकडे मनाचा ओढ असतो. तिकडून मनाला मुसक्या बांधून खेचून आणलं पाहिजे. फ़ार शेफ़ारलाय तो, डोक्यावर बसलाये, त्याला शिस्त लावली पाहिजे.

६२-६५ वर्षांचा डेव्ह रात्री २:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत ऑफ़िसात काम करतो. बिलकुल टीपी न करता. नाही त्याच्यासारखं रोज १६ तास पण निदान ८ तास तरी? पण त्याच्याइतक्या क्वालिटीनं? त्याला त्याचं काम आवडतं, ते तो किती उत्साहाने करतो. त्या कामाचाच विचार करत रहातो, झपाटून पझल्स सोडवत असल्या सारखा. मी मात्र एरर देणाऱ्या फ़ेल झालेल्या सिम्युलेशन कडेही भगवान बुद्धाच्या निरपेक्ष शांत अर्धोन्मिलित नेत्रांनी बघत रहातो. अडकलेल्या सिम्युलेशन्सचं आणि दिवसागणिक जवळ येत चाललेल्या डेडलाईन्सचं मला काहीच वाटत नाही. मला दिलेल्या टास्क्स ह्या मी कुणासोबत तरी मिळून पूर्ण करायच्या असतात, त्या आपोआप पूर्ण होतात. "न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मॄगा:" असं लिहीणाऱ्या श्लोककर्त्याचं आयुष्य किती खडतर गेलं असेल असं मला वाटून जातं.

मी हे पोस्ट टायपत असताना ही माझ्या नावाने कितीतरी टास्क्स पेंडिंग आहेत, मला त्यांच्याबद्दल फ़क्त ममत्त्व वाटतं. त्यांना पोटाशी धरून ठेवावं फ़क्त कुशीत, त्यांना संपवू नये कधीच.

If you are not enjoying your work, then you can not enjoy your life असंही कुठेतरी वाचलेलं आठवतं. खरं असेल का ते?

चिंटू एकदा अभ्यासाचं पुस्तक हातात धरून एका हाताने उसाचा रस पीत असतो. आई विचारते "असं कां?" चिंटू म्हणतो, "बाईंनी सांगितलंय, अभ्यासात रस घेत जा." मी पण ऑफ़िसच्या कामात रस घ्यायला पाहिजे. चिंटू घेतो तसा नाही, तर बाईंनी सांगितलेलं असतं तसा. पण रस वाटत नसेल तर तो कसा निर्माण करायचा?

तो रस घेणं जितकं अवघड तितकंच व्यायाम करणंही. सगळे फ़ायदे माहीत आहेत, मनाला कळतं पण शरीर वळत नाही. वळवलं तर शरीरही वळेल, पण सुरूवात करण्य़ाच्य़ा कंटाळ्याचा स्टॅटिक इनर्शिया उंच डोंगराएवढा स्पीडब्रेकर वाटतो, तो ओव्हरकम करता येत नाही.

नेटवर पेपर वाचणं सोपं आहे. ब्लॉग चाळणं, ब्लॉगर मंडळी ज्या फ़्रिक्वेन्सीनं ब्लॉग लिहीतात त्याच्या १००० पट जास्त फ़्रिक्वेन्सीनं ते अपडेट झालेत का तपासणं, ते अपडेट्स एका साईट्वर एकत्र दिसत असूनही नवीन कमेण्ट्स आहेत का हे पहायला इण्डिव्हिज्युअल ब्लॉग जाऊन तपासणं, व्हिडीओ गेम खेळणं, स्वत:हून कुणालाही न लिहीता कुणी आपल्याला लिहीलंय का हे पुन्हापुन्हा याहूमेल, जीमेल, ऑर्कुट, फ़ेसबूक वर जाऊन पहाणं सोपं आहे. आनंददायक आहे.

अवघड गोष्टी स्वत:कडून करवून घेऊन, त्या त्रासातून जाऊन त्या प्रोसेसच्या शेवटी आनंद मिळणार असेल, आणि जर ह्या दुसऱ्या कॅटेगरीतल्या सोप्या गोष्टींनी इन्स्टंट आनंद मिळणार असेल, तर "कोई वो क्यों ले? ये न ले?" यावर कुणी "मान गये, आपकी पारखी नजर और निर्मा सुपर दोनोंको" असं म्हणा हो.

नाहीतरी बाळाच्या नव्या पासपोर्टवर लिहीलंच आहे की "This constitution works towards the fact that pursuit of happiness is one of the unalienable rights of the man who's created equal by the creator".

पण बाळाच्या बाबांकडे भारतीय पासपोर्ट असेल तरी त्यांना हे वाक्य लागू होतं कां?

Monday, June 1, 2009

अंगाईगीत

10 प्रतिक्रिया
अपर्णाने तिच्या ब्लॉगवर एक अंगाईगीत लिहील्यावर आमचंही पेटंट अंगाईगीत लिहावं म्हटलं. खालील गीताचे सर्वाधिकार ठाकूर कुटुंबियांकडे सुरक्षित आहेत याची नोंद घ्यावी.

***
गाई.. गाई.. सगळ्या गाई.. गोठ्या गेल्या, आमची गाय.. जात नाही!

गाई.. गाई.. सगळ्या गाई.. ऐकतात बाई, आमची गाय.. ऐकतच नाही!

गाई.. गाई.. डोळे मिटले.. सगळ्या गाईंनी, आमची गाय.. मिटतच नाही!

गाई.. गाई.. सगळ्या गाई.. झोपी गेल्या, आमची गाय.. झोपतच नाही!

गाई.. गाई.. सगळ्या गाई.. भोळ्या बाई, आमची गाय.. डॅंबीस बाई!

गाई.. गाई.. सगळ्या गाई.. शहाण्या बाई, आमची गाय.. वेडू बाई!
***

इतकं गाणं हळू आवाजात म्हणेस्तोवर कडेवरची गाय पेंगतेच पेंगते. मग आपल्या लेकराला खूप नावं ठेवली असं वाटत असेल, तर सगळी कडवी पुन्हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये म्हणावीत, फ़क्त यावेळेस स्वत:च्या गायीचं कौतुक करावं आणि खऱ्या गाईंना नावं ठेवावीत. :-)

Thursday, May 28, 2009

फ़िल्मी मौती (२)

7 प्रतिक्रिया
हिंदी चित्रपटात सर्वाधिक डेथसीन्स करण्याचं रेकॉर्ड नाझिर हुसैन साहेबांकडे जाईलसं मला वाटतं. त्यांचं ते राजेशाही महालाच्या वरच्या मजल्यावरच्या लग्नाच्या हॉलच्या साईझच्या बेडरूम मध्ये, एका हातात आशा पारेख / सायराबानो / शर्मिला टागोर / साधना आणि तत्सम युवतीचा हात धरलेला असताना, दुसऱ्या हातात धर्मेंद्र / राजेंद्र / जितेंद्र / राजेश / विनोद / जॉय मुखर्जी / शम्मी / शशी आणि तत्सम युवकाचा (?) हात असतो. मग ते म्हणतात, "नही बेटी, डॉक्टर अंकल को मत बुलाना. मेरे पास अब इतना वक्त नहीं है। तुम्हारी मॉं के गुजर जानेके बाद मुझे तुम्हारीही चिंता खाये जा रही थी। आज मैं मेरी जिम्मेदारियॉं प्रकाश/अशोक/अमर के हाथ मे सौंपकर चैन से मरना चाहता हूँ।"

मग ढॅंग्ग्ग्ग्ग्ग्ग.. आणि "नहीं..डॅडी..नहीं..." करत नाझिर साहेबांना बिलगणारी कन्या, तिचे केस त्यांच्या नाकात जाऊन त्यांना शिंक येईल याची पर्वा करत नाही.

on the side note, सर्वात जास्त अपमानकारक आणि अन्यायाने मौत आल्या सत्येन कप्पू साहेबांना. कोणताही सिनेमा सुरू झाला, की पावसात उभा राहून कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा हा कॉम्रेड पुढच्या १० मिनिटांत व्हिलनच्या हातून खपवला जातो. त्याची होनहार मुलं मग ३ तासांनी त्याच्या दर्दनाक मौतीचा बदला घेतात.

निरूपारॉय काकूंना तर इतके हालात दिवस काढावे लागायचे, की सिनेमाच्या पहिल्या १० मिनिटात खून पडून मेलेल्या नवऱ्याचा (बऱ्याचदा सत्येन कप्पू च) तिला हेवा वाटावा. मग मुकादमाच्या हाताखाली खाणीत दगडाच्या पाट्या वाहून नेण्याचं काम बऱ्याचदा केल्यावर त्यांनी दिग्दर्शकांकडे अट घालायला सुरूवात केली असणार - ’एकतर मला चांगलंचुंगलं नेसाय-खायला दे. ते तू देणार नाहीसच. तसं द्यायचं असतंस तर शशीकलेला घेतलं असतंस. पण हाल करायचेच असतील तर निदान १ रूमच्या घरात शिवणयंत्रावर टीपा मारायचं तरी काम दे. तशी मोठी करीन मी मुलं. पण उन्हात दगडं वहायला लावणार असशील तर चालता हो.’ आणि नेमका मुलांचाही तिच्यावर जीव एवढा की काहीही झालं तरी ते काही तिला मरू द्यायचे नाहीत, कसंही करून वाचवायचेच.

Tuesday, May 26, 2009

... वक्त बहोत कम है। ...

13 प्रतिक्रिया
काल दसविदानियॉं चित्रपट पहात होतो. तसं ह्या सिनेमाबद्दल लिहीण्यासारखं बरंच काही आहे, पण ते नंतर कधीतरी. आज विषयांतर नको. सिनेमाच्या शेवटाला त्याचा डायरेक्ट हार घातलेला फोटोच दाखवलाय. मला वाटलं होतं आता मस्तपैकी विनय पाठक चा डेथसीन पहायला मिळेल! पण तो चान्स हुकल्याने आधी हादरवून गेलेले डेथसीन्स आठवले.

माझ्या फ़ेवरेट २ डेथसीन्स मध्ये १ अगदीच प्रेडिक्टेबल आहे, आणि दुसरा एकदम टोटल सरप्राईज पॅकेज. पहिला म्हणजे आनंद मधला राजेश खन्ना चा. सिनेमाभर हसत हसवत राहुन आजारपणाला आणि वेगाने झेपावणाऱ्या मॄत्यू ला मामूली समजणारा आनंद मौत जशीजशी जवळ येते तसा व्याकूळ होऊन भास्कर ला म्हणतो, "मुझे बचा लेना, मैं मरना नहीं चाहता".. आणि शेवटी सगळा खेळ संपल्यावर टेपरेकॉर्डर मधून येणारी खणखणीत "बाबू मोशाय" ची हाक एकाचवेळी अंगावर काटा आणि कपाळावर घामाचे थेंब आणते. हॄषीदांनी हा सिनेमा राज कपूरला काही असाध्य रोगाचं (हार्ट ऍटॅक?) निदान झाल्यावर सैरभैर वाटल्याने बनवला होता म्हणे.

आणि दुसरा फ़ेव आहे, राजेशच्याच ’दो रास्ते’ मधला, त्याच्या आईचा. तो आईचा रोल कुणी केला होता हे ही मला माहीत नाही! फ़क्त सीन आठवतो. बलराज साहनी तिचा सावत्र मुलगा असतो, आणि राजेश, प्रेम चोपडा आणि एक मुलगी (कुमुद छुगानीच असावी!) हे तिचे सख्खे संतान. बिंदूच्या नादी लागून प्रेम वेगळा रहातो, आणि बलराज गरीबीत असूनही सावत्र आई, आणि सावत्र भाऊबहीणीला सांभाळतो. आई मरताना स्मॄतीभ्रंशाने बलराजला राजेश, आणि राजेशला बलराज समजते, आणि समजावते. तिची ऍक्टिंग सो-सो च असली, तरी त्या स्मॄतीभ्रंशाने तिने बलराजकडे बलराजचीच स्तुती करणं, आणि राजेशकडे राजेशला सांभाळून घेण्याचं साकडं घालणं, ही दिग्दर्शकाची आइडिया स्तब्ध करून जाते.

अमिताभने डेथसीन्स ला डाव्या हाताचा मळ करून टाकलं. शोले, दीवार, डॉन, मुकद्दर का सिकंदर, अग्निपथ.. आणि कितीतरी अनेक..

डेथसीन्स मध्ये सगळ्यात जास्त वात आणतो तो शाहरूख. म्हणजे आधीच शाहरूख, आणि त्यात डेथसीन म्हणजे कहर होतो अगदी. त्याचा तो ताज्या तांबड्या रंगाने माखलेला लहूलुहान चेहरा, थरथरणारे ओठ, आवाज आणि पाणीदार डोळे अगदी वीट आणतात. पहा : डर, बाजीगर, अंजाम, करण-अर्जुन, देवदास, गुड्डू, कल हो ना हो, ओम शांती ओम, .. इत्यादी.

चांगल्या डेथसीन्स मध्ये अजून एक आहे ती गंगाजमुना मधली गोळी लागून गपकन खाली बसणारी वैजयंती.

बरेच राहून गेलेसं वाटतंय. ह्या पोस्टचा पार्ट टू लिहावाच लागेल नंतर कधीतरी..

Tuesday, May 12, 2009

सुख म्हणजे नक्की काय असतं?

6 प्रतिक्रिया

आयुष्य आनंदानं जगण्यासाठी काय हवं असतं?

हे म्हणजे प्रशांत दामलेच्या 'एका लग्नाची गोष्ट' नाटकातल्या "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं?" गाण्यातला अनादि-अनंत प्रश्न आहे!

प्रत्येकाचं उत्तर एकच असावं - 'उत्साह'.

हा उत्साह (चेतन भगत ज्याला सारखा 'स्पार्क' म्हणतो, तो) कशातून मिळेल ह्याबाबत प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. घरातल्यांची सोबत, सुट्टी, छंद, गावाकडची सहल, व्यायाम, खाणं/खात रहाणं पैकी काहीही..

हे उत्तर कसं वाटतं बघा - 'यश'.

ऑफ़िसात खूप काम असावं. सगळे रिसेशनने घाबरलेले प्राणी काम आपल्या वाट्याला यावं म्हणून टपून बसलेले असताना ते नेमकं आपल्या वाट्याला यावं. आणि आकाशातले ग्रह चांगले असल्याने (दुसरं काही असूच शकत नाही हो) ते आपल्याकडून बरं पार पडावं.

चिकाटीने पार पाडलेल्या हातातल्या कामातून यश मिळण्यासारखं उत्साहवर्धक अजून काही नाही. घरातल्यांची सोबत, सुट्टी, छंद, गावाकडची सहल, व्यायाम, खाणं/खात रहाणं, आईनं केलेली पुरणपोळी, रंगांची होळी, किंवा दिव्यांची दिवाळी सुद्धा! बऱ्याच दिवस कुठल्याही प्रकारचं यश पाहिलेलं नसेल तर जिवाची जी चिडचिड होते त्या मन:स्थितीत उपरिनिर्दिष्ट यादीतलं काहीच गोडच लागत नाही बघा!

हे सारखं सारखं विसरायला होतं, आणि पुन्हा पुन्हा नव्यानं शोध लागतो, म्हणून आज लिहून ठेवलं.

Thursday, April 16, 2009

डायरीतली गाणी

10 प्रतिक्रिया
MP3 प्लेअर मधल्या ’ओल्ड हिंदी सॉंग्ज’ फ़ोल्डरमधली किशोरची गाणी कमी करायला हवीत. किंवा किशोरला वेगळं फ़ोल्डर द्यायला हवं. त्याची ’देखा ना हाये रे’, ’आते जाते खूबसूरत’, ’नदीयासे दरिया’, ’केहेना है’ वगैरे असंख्य गाणी एकामागून एक वाजत राहिली की जुन्या गाण्यांना ऐकण्याचा मूड कुठेतरी पळून जातो.

आल्फ़ाबेटीकली लावल्याने केव्हाही कुणाचीही गाणी लागत असताना तलतचं ’मैं दिल हूं इक अरमान भरा’ लागलं, आणि माझी गाण्यांची डायरी आठवली. नेहेमीपेक्षा मोठ्या साईझचं पान असलेल्या त्या डायरीत कितीतरी गाण्यांच्या पूर्ण लिरीक्स टेपरेकॉर्डर वर ’रिवाइंड-प्ले-पॉज’ करत लिहून ठेवलेल्या होत्या. तेव्हा त्यात हे गाणं नव्हतं.

गायकांचा आवाज, संगीतकाराने दिलेली चाल यापेक्षा सारं लक्ष लिरीक्सकडे, त्यातल्या शब्दांकडेच असायचं. मग त्या कलेक्शनमध्ये ’मैने पूंछा चॉंद से’, ’शाम-ए-गम की कसम’, ’प्यार पर बस तो नहीं हैं मेरा लेकीन फ़िरभी’, ’तुम मुझे भूलभी जाओ तो ये हक हैं तुमको’, ’शोखियोंमे घोला जाये फ़ूलोंका शबाब’, ’वो चुप रहें तो मेरे दिल के दॉंग जलते हैं’, ’रूलाके गया सपना मेरा’ अशी गाणी होती. का कोण जाणे त्यात ’हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले’ पण होतं. अगदी त्यातल्या ’ऐ बाबू कहॉं चल दिये’ सकट!

नंतर मधेच एकदा परख मधलं लताचं ’ओ सजना’ आवडलं. तिचा आवाज आणि सलीलदांचं संगीत आवडलं म्हणून. आणि गाण्यांच्या लिरीक्सनं घायाळ होणं ही कमी होत गेलं. कधीतरी ती गाण्यांची डायरी फ़ाडून फ़ेकून दिली गेली.

सध्याच्या कलेक्शनमध्ये एकही दु:खी गाणं नाही. पण वा! तलत तर पाहिजेच म्हणून हे ’मैं दिल हूं’ घेतलेलं.

तर आज ती डायरी आठवली. आणि हो, किशोरला वेगळं फ़ोल्डर दिलंच पाहिजे. पण तसं केल्यावर त्या बिचाऱ्याचं ते फ़ोल्डर कधी खास ऐकावं अशी इच्छा होईल कां?

Friday, March 20, 2009

.. आणि आज ..

13 प्रतिक्रिया
टेन्शन.. स्लीपलेस नाईट्स.. टूडूलिस्ट.. ऍंक्झायटी.. सेलिब्रेशन.. एक्साईटमेंट.. :-)

जीवनकी बगिया महकेगी.. चहकेगी.. लहकेगी..

12 प्रतिक्रिया
ती येतेय.

तो असता तर सोपं होतं. तो आला असता, त्याचा तो मित्रांसोबत भटकून मोठा झाला असता, आणि शिकून त्याच्या मार्गाला लागला असता. त्याच्याशी केव्हाही गप्पा मारल्या असत्या, घाई काय आहे? पण येणारी ती आहे कळल्यावर जास्त भंबेरी उडालीये. तिला जगापासून वाचवावं लागेल. जगातलं वाईट नेमकं चटकन कसं ओळखावं हे शिकवावं लागेल. तिला स्ट्रॉंग बनवण्याची तयारी म्हणून आधी स्वत: स्ट्रॉंग बनावं लागेल.

आता जबाबदाऱ्या आहेत. कालसारखं ’सूखे पत्ते की तरह हवेवर उडत रहाण्याचं’ निवांत आयुष्य बदललं पाहिजे. थोडीच वर्षे आहेत. ती लग्न करून सासरी जाण्यापूर्वी तिच्य़ासोबत मनसोक्त राहून घेतलं पाहिजे. नंतरही भेटता येईलच. पण तिला माहेरवाशिणीला सासरचे किती दिवस आपल्याकडे सलग राहू देणार? जास्त दिवस झाले तर आपणच ’आता पुरे’ म्हणून तिला पाठवून देऊ. आणि आपण जरी गेलो तिच्याकडे तरी जावयाच्या घरी जास्त दिवस कसं रहायचं, नां?

आता ऑफ़िसात वेळ जास्तीत जास्त एफ़िशिअण्टली घालवून घरी लवकरात लवकर जात रहायला हवं.

आता काईच्या काई कादंबऱ्या आणून वाचणं ही पुरे. घरात किरण बेदी, इंदिरा गांधी यांचीतरी चरित्र हवीत. फ़ाउंटनहेडची डॉमिनिक् ही नको. कोणत्या बापाला आपली पोरगी तिच्यासारखी आपलं आयुष्य असं बेदरकारपणे जगलेली आवडेल? रणबीर, दीपीका च्या ’बचना ऐ हसींनों’ ची ही डीव्हीडी आणून ठेवावी. लहानपणापासूनच कळू देत तिला की नुकती मिसरूड फ़ुटायला लागलेले पोरं जेव्हां वर्गातल्या पोरींच्या प्रेमात पडतात तेव्हा ते किती मूर्ख असतात आणि कधीकधी चालू आणि हलकट सुद्धा. नाही तिला ’खरं’ प्रेम सापडलं त्यांच्यात, तरी हरकत नाही. असूदेत बाकी मैत्रिणींकडे बॉयफ़्रेण्ड्स्. तुझ्याकडेही एक पाहिजेच असायला, बॉयफ़्रेण्ड म्हणजे काही स्कूटी नाही. आगीशीच खेळ तो. त्यापेक्षा नीट शिक. तुफ़ान कडक आत्मविश्वास ठेव जगात वावरताना. नवरा केव्हांही शोधता येईल. नाहीतर मी शोधून देईन. त्याचा चांगला खरमरीत इण्टरव्ह्यू घेतल्यावर.

एक ’कयामत से कयामत तक’ चीही डीव्हीडी आणून ठेवायला हवी. आमच्या दोघांसाठी. मुलांवर प्रेम करता करता ती मोठी झाल्याचं न ओळखता आल्याने आम्ही त्यांना आपली खाजगी मालमत्ता समजत राहू नये म्हणून.

गुड सन, गुड ब्रदर, गुड हजबण्ड, गुड फ़्रेण्ड, गुड पर्सन, गुड सिटीझन असण्याच्या परीक्षांत गुड फ़ादर बनण्याच्या परीक्षेची भर. आधीच्यांपेक्षा मह्त्त्वाची आणि अवघड परीक्षा ही. आणि ही परीक्षा जेव्हां डिक्लेअर होते तेव्हाच सुरूही होते. आणि लगेच मार्क्स् ही लिहीले जायला लागतात. तयारीसाठी मधे पी.एल्. नाही.

माझा आनंद दिसत नाहीये कां? काळजी आणि मायेखाली झाकला गेला असेल तो. तिला तिच्या आईच्या पोटात कूस बदलून पुन्हा झोपताना बघितलं आणि बाकी सगळ्यांना दूर करून माझ्या आयुष्यातल्या सर्वांत अनमोल व्यक्तीची जागा तिने पटकावली.

आजच्या डायरीतला तुकडा हा. या गोष्टीला पंच् नको.

तारीख : ५ नोव्हें. २००८.
वेळ : अल्ट्रासाउंड झाल्यावर तासाभरानंतरची.

Monday, March 9, 2009

सत्यशील आणि चार्वाक

3 प्रतिक्रिया
संवेदचं लेटेस्ट पोस्ट, आणि त्यावरची श्रद्धाची कमेंट वाचून ही उत्तरकथा लिहावीशी वाटली. संवेद, हलकेच घे रे! :-)

***

इतक्यांदा राजसभेत वादविवादात निरूत्तर करूनही सत्यशीलाच्या मनीचं वादळ काही शमलं नाहीये, आणि तो शेवटी त्याला जे करायचं तेच करायला निघाला आहे, हे आलेल्या संदेशवाहकाकडून ऐकल्यावर चार्वाकाच्या मस्तकीची शीर तरारली, आणि तो क्षणभर विचार करून पाकगॄहाकडे वळाला. पाकगॄहातून शुद्ध घॄताने भरलेला द्रोण घेऊन त्याने तीरासारखा रथ गाठला, आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने घोडे सीमेच्या दिशेने दौडवले.

बुद्धिमान आणि सुदॄढ अशा, पिळदार शरीरयष्टीच्या महाराजांची आकॄती त्यांच्या वयाचा अंदाज येऊ देत नसे, आणि यामुळे महाराजांबद्दल चार्वाकाला अपार आदर आणि प्रेम होते. पण आज त्यांची खांदे पाडलेली पाठमोरी आकॄतीच चार्वाकाला त्यांची हतबलता सांगून गेली. वेदाभ्यासाच्या वेडापायी स्वत:च्या प्रकॄतीकडे लक्ष न देणारा पंडूरोगाने ग्रस्त, निस्तेज, कॄश, सत्यशील - महाराजांच्या विरूद्ध टोक होता. वेदोपनिषिदांना संपूर्ण सत्य मानून, त्यांचा अभ्यास करताना टीकात्मक दॄष्टीकोण न ठेवणाऱ्या सत्यशीलाने, शून्याच्या शोधात वेडापिसा होण्यापेक्षा, पित्याचा आदर्श ठेवून रोज द्वादश सूर्यनमस्कार घातले असते, आणि तालिमीत जोरबैठका काढून बेटकुळ्या फ़ुगवल्या असत्या तर किती बरे झाले असते, हा विचार पुन्हा चार्वाकाच्या मनात येऊन गेला.

सावलीचा मोह धरावा की सोडावा, हे सत्यशीलाच्या मनातलं द्वंद्व महाराजांसाठी जितकं अगम्य होतं तितकंच चार्वाकासाठीही. पण आस्तिकांच्या मनाचे हे असे खेळ चार्वाकाला पुरेपूर ठाऊक होते. सूर्य, वा इतर कुठल्याही प्रकाशमान वस्तूपासून निघालेला प्रकाश एखाद्या अपारदर्शक वस्तूने अडविला, तर त्या अपारदर्शक वस्तूची विरूद्ध दिशेला सावली पडते. हा साधा भौतिकी नियम मानायचा सोडून, त्या अपारदर्शक वस्तूने त्या सावलीचा मोह कसा सोडावा याचा काथ्याकूट करत कुढत बसणं, चार्वाकासाठी निर्बुद्धपणाचा कळस होता.

महाराजांनी चार्वाकाकडे फ़ार आशेनं पाहिलं.

एकीकडे सत्यशीलाचा शून्याच्या शोधाचा प्रवास सुगम करणारे ब्राह्मण अजबलीची तयारी करत होते. अज रूपात असलेल्या हैवानाला अशा बळी देण्याने त्वरित स्वर्गप्राप्ती होईल अशी खात्री त्यांनी सत्यशीलाला दिली होती. ते परमसत्य वेदांच्या कुठल्या ॠचेत कुठल्या शब्दांत लिहून ठेवले आहे, हे सत्यशीलालाही मुखोद्गत होतेच.

कॄद्ध चार्वाकाने ते सहन न होऊन, पुढे येऊन ब्राह्मणांना ललकारले, "भो द्विजा, जर बलीप्रक्रियेने त्वरित स्वर्गप्राप्ती होत असेल, तर आपण आपल्या जराजर्जर माता पित्यांचाच बळी देऊन त्यांस सद्गती का देत नाही?"

एका प्रश्नाने त्यांस निरूत्तर करून, चार्वाक सत्यशीलाकडे वळाला. "सत्यशीला, शरीरापासून आत्मा वेगळा नाही. पॄथ्वी, अग्नि, वायू आणि जल यांपासून जसा देह बनला आहे, तसेच त्याच्या आतले ते चैतन्यही. जसा देह या तत्त्वांपासून बनतो आणि पुन्हा त्यांत समर्पित होतो तसेच ते चैतन्यही. इहलोक हा एकच लोक. परलोक ही फ़क्त पुराणातली एक मनोरचित कल्पना. सोड त्या शून्याचा शोध. आणि आहे हे जीवन उत्साहाने आणि आनंदाने जगून बघ. हे पुन्हा मिळणे नाही."

शुद्ध घॄताचा द्रोण सत्यशीलापुढे धरून चार्वाक पुढे वदला,

"यावज्जीवेत सुखं जीवेत,
ॠणं कॄत्वा घॄतं पिबेत,
भस्मीभूतस्य देहस्य,
पुनरागमनं कॄत्वा?"

सत्यशीलाचा निश्चय डगमगला, आणि महाराजांचे पाणावलेले डोळे प्रथमच आशेने चमकले!

***

(श्लोकाचा अर्थ : जोवर जीवन आहे, तोवर ते मनमुराद सुखाने जगून घ्यावे. त्या सुखांसाठी आवश्यक साधने नसतील तर ॠण घ्यावे, आणि त्या ॠणातून शुद्ध तूप पिण्याइतपत सुख मिळवावे. कारण, एकदा देहाची राख झाल्यानंतर पुनर्जन्म वगैरे काहीही मिळणार नाही हे निश्चित आहे.)

Thursday, March 5, 2009

स्क्वेअररूट डे

4 प्रतिक्रिया
परवा स्क्वेअररूट डे येऊन गेला.

ज्या दिवशी तारीख आणि महिना यांचे क्रमांक तेव्हा चालू असलेल्या इसवी सनाच्या शेवटच्या दोन आकड्यांचे वर्गमूळ असतात, तो दिवस स्क्वेअररूट डे म्हणून साजरा करतात. म्हणून ३-३-०९ हा नुकताच येऊन गेलेला स्क्वेअररूट डे.

या दिवशी ’मूळ’भाज्या (मुळा, गाजर, रताळी, बीट इ.) ह्या चौकोनी आकारात कापून (स्क्वेअर रूट अशाही अर्थी) जेवणात (निदान सॅलड मध्ये) खाल्ल्या जातात.

काय म्हणता? नाही साजरा केला स्क्वेअररूट-डे? फ़िकीर नॉट! पुढचा येईलच की. जरा दम धरा - ४ एप्रिल २०१६ पर्यंत!

दर शतकात एकूण ९ वेळा हा दिवस येतो. १-१-०१ पासून ते ९-९-८१ पर्यंत.

लकीली १९८१ सालाआधी जन्म झालेला असल्याने मला तो ही डे मिळाला. म्हणजे परवाचा धरता एकूण चारदा हा डे पाहिला.

धोंडो केशव कर्वेंनी त्यांच्या उभ्या आयुष्यात ९ स्क्वेअररूट डे पाहिले.

जाऊ दे.. मी पिळतोये आता..

Tuesday, February 24, 2009

खूपसारे, उशीरा, आणि चुकीच्या ठिकाणी..

9 प्रतिक्रिया
८४ नंतर वर्ल्डकप नाही मिळाला तरी कुठलीही फ़ालतू मॅचही जिंकल्यावर आनंदी होणारं राष्ट्राभिमानी भारतीय मन, कालच्या ऑस्कर च्या निकालांनंतरही फ़ारसं आनंदलेलं नाही. अभिमान वाटत नाहीच, पण आज वेगवेगळ्या साईट्स वर जाऊन बातम्याही वाचायचं टाळतोय, कारण सगळीकडे तेच लिहीलंय.

कारण एकच.. 'पॉव्हर्टी पोर्न' बिरूद सार्थक ठरवणाऱ्या चित्रपटानं धारावीचं रूप, आणि आपल्या इंडियाच्या आतला खरा भारत, जगापुढे उघडानागडा आणून ठेवला, आणि जगानं तो चवीनं बघून त्याचं अमाप कौतुक केलं. यात आपल्याला अभिमान वाटावा की लाज, समजत नाहीये.

ह्या नकोशा प्रसिद्धीत आपल्या रेहमानचं आपण कौतुक करत नाहीये ह्याचीही खंत वाटते मग. त्याने बिचाऱ्याने फ़क्त संगीत दिलं ना, धारावी कशी दाखवावी हे त्यानं कुठं ठरवलंय शूटींग दरम्यान? पण तरीही नाही आनंद झाला..

स्लमडॉग ला मेन कॅटेगरीत अशी ८ ऑस्कर्स मिळण्याऐवजी तेव्हा लगान ला 'बेस्ट फ़ॉरिन फ़िल्म कॅटेगरी'तलं ते एकमेव साईडचं ऑस्कर मिळालं असतं तरी किती बरं झालं असतं, कित्ती बरं वाटलं असतं!

Tuesday, February 17, 2009

तिसरं पुस्तक

10 प्रतिक्रिया
एक इंग्रजी कादंबरी वाचून पुरी केल्यावर दुसरी कशीबशी पाऊण पर्यंत आणलीये. तिच्या नंतर नंबर कुणाचा लावावा हा संभ्रम होता. २ वर्षाला पावणेदोन पुस्तकं ह्या हिशेबाने वाचन होणार असेल तर निदान ती निवडक वाचावीत म्हटलं. नेटवर ऑल टाईम बेस्ट नॉव्हेल्स साठी खूप सर्च केले, आणि त्या लिस्ट्स खालच्या कॉमेण्ट्सही. त्यातून बनली ही लिस्ट. पण ही लिस्ट आणि त्यावर सुझाव देणारे सारेच ब्रिटीश युनिव्हर्सिटीतले लिटरेचरचे स्टुडण्ट्स वाटत होते. त्यामुळे ह्या लिस्टमधली बरीचशी पुस्तकं फ़क्त चाळल्याबरोबर आपल्याला झेपणारी नाहीत हे यथावकाश कळेलच. तुमची काही आवडती असतील तर ती ही सुचवा. मग जी उरतील आणि वाचली जातील, त्याबद्दल त्या त्या वेळी सांगेन..

***
To Kill a Mockingbird - Harper Lee
1984 - George Orwell
A Clockwork Orange - Anthony Burgess
Catch 22 - Joseph Heller
Brave New World - Aldous Huxley
The Count of Monte Christo - Alexandre Dumas, Pere

**
One Flew over the Cuckoo's Nest - Ken Kesey
The Brothers Karamazov - Fyodor Dostoevsky
The Catcher in the Rye - J. D. Salinger
Lord of the Flies - William Golding

*
The Great Gatsby - F. Scott Fitzgerald
Animal Farm - George Orwell
The Adventures of Huckleberry Finn - Mark Twain
Les Miserables - Victor Hugo
David Copperfield - Charles Dickens
The Martian Chronicles - Ray Bradbury
The Iliad - Homer
The Odyssey - Homer
The Aeneid - Virgil
Don Quixote - Miguel de Cervantes Saavedra
The Stand - Stephan King
It - Stephan King
The Prince - Niccolò Machiavelli
His Dark Materials - Philip Pullman
The Handmaid's Tale - Margaret Atwood
One Day in the Life of Ivan Denisovich - Aleksandr Solzhenitsyn
Sense and Sensibility - Jane Austen
The Code of the Woosters - P. G. Wodehouse
A Tale of Two Cities - Charles Dickens
Siddhartha - Hermann Hesse
The Name of the Rose - Umberto Eco
One Hundred Year's of Solitude - Gabriel García Márquez
Dune - Frank Herbert
Little Women - Louisa May Alcott
A Connecticut Yankee in King Arthur's Court - Mark Twain
Stranger in a Strange Land - Robert A. Heinlein
Wuthering Heights - Emily Brontë
A Confederacy of Dunces - John Kennedy Toole
On the Road - Jack Kerouac

(यात रेकमेण्डेशन्स नुसार २* मध्ये Vladimir Nabokov चं Lolita पण द्यायला हवं होतं. पण त्याला जनतेनं कितीही स्टार्स दिले तरी त्या पिडीओफ़िलिक पुस्तकाकडे मी फ़िरकणार नसल्याने ते इथे लिस्ट ही केलं नाहीये.)

देशभक्ती रॉकिंग

7 प्रतिक्रिया
काल की नै मज्जाच झाली.

बीफ़ोरयू वर ’इट्स रॉकिंग’ नावाचं जुन्या नव्या चित्रपटगीतांचं छायागीत चालू होतं.

पैलं गाणं लागलं - "आ जानेजा.. आ मेरा ये हुस्न जवाँ.. तेरे लिये हैं बाहें पसारे ओ जालिम आ जा ना.."
आत्तापत्तूर लतादीदींनी गायलेलं एकमेव कॅब्रे डान्स सॉंग म्हणून ह्या गाण्याची नोंद ठेवलेली. पैल्यांदा लक्षात आलं - अरे गाण्यावर खुद्द पद्मश्री हेलन खान नाचताहेत. मग ऐकण्यासोबत चवीनं गाणं बघितलं सुद्धा.

दुसरं लगेच लागलं - इन्साफ़ चित्रपटातलं - "बाराना दे.. दे.. बाराना..."
आता हे गाणं आमचे परममित्र खाबे यांचं १९९७ मधलं सर्वाधिक सुपरडुपर आवडतं गाणं म्हणून लक्षात ठेवलेलं. (१९९७ मध्ये ’दिल तो पागल है’, ’बॉर्डर’, ’परदेस’, ’विरासत’, ’येस बॉस’ अशा काही सो-सो चित्रपटातली काही सुमार गाणीही काही लोकांना आवडली होती.)
पण काल पैल्यांदा नोंद घेतली ती पद्मश्री अक्षयकुमार यांच्या त्या गाण्यातील उपस्थितीची!

आणि मग तिसरं लागलं - "जब किसीकी तरफ़ दिल झुकने लगे..."
ही ओळ कानावर पडल्याबरोबर - काजोलने देवगणांच्या घराण्यात काय पाहिलं असेल ह्या विचारात गुंगणारं मन आज हॅट्ट्रिकच्या मिषाने त्या सुरेल सानुनासिक (’सानु’नासिक) स्वरावर शिंकरलं. दस्तुरखुद्द पद्मश्री कुमार सानू यांचा तो मधाळ आवाज! वाह!

आणि हॅट्ट्रिक होऊन गेल्यावर बच्चनांच्या पद्मश्री ऐशचं "इश्क कमीना.." च्यानल बदलताना सापडलं, तर ते ही बघून घेतलं.

ह्या चार महान आत्म्यांनी आत्तापर्यंत केलेली देशसेवा आठवून मला अगदी गलबलूनच आलं. आणि इश्क कमीना संपल्यावर मी उठून मोट्ठ्याने "जय्य्य..हिंद्द्.." म्हटलं.

मराठमोळा हिसका

7 प्रतिक्रिया
स्टारस्क्रीन पुरस्कार सोहळ्यात आशुतोष आणि साजिदची जुंपलेली सर्वांनीच पाहिली असेल. आशुतोषचे मुद्दे बरोबर होते, त्याला नंतर पाठिंबा द्यायलाही बरेचजण पुढे सरसावले. पण एकंदरीत तो ’शो’ पहाताना बरंचसं अवघडल्यासारखं (म्हणजे एम्बर्रास्सिंग हो!) झालं होतं. आशुतोष रंगमंचावरून खाली येऊन खुर्चीत बसल्यावर फ़राहा ला उभा राहून हातवारे करून घड्याळ काय दाखवत होता. आणि त्याची बायको बिचारी त्याच्या कोटाची बाही ओढून त्याला खाली बसवत होती.

आशुतोषने असं रागाने खदखदत बोलण्यापेक्षा जरा विनोदबुद्धी जागॄत ठेवून, कोपरखळ्या आणि शालजोडीतले मारून मुद्दे मांडले असते तर किती बरं झालं असतं. साजिदने मग जो ’बाप’ काढला, आणि फ़राहा ने (पुन्हा) अक्कल पाजळली, ते टळलं असतं.

बायका तर बायका, आपले मराठी पुरूष सुद्धा भडकले की भांडतात चाळीच्या सार्वजनिक नळावर पदर खोचून भांडल्यासारखेच. "भांडावं कसं" या कोचिंग क्लासनंतर "स्थलकालानुसार आणि विविध वर्गातल्या प्रेक्षकांनुरूप कसे भांडावे" हा वरच्या वर्गाचा कोर्सही वपुंच्या जोशी ने सुरू केला पाहिजे असं दिसतंय.

Monday, February 16, 2009

ग म भ न

6 प्रतिक्रिया
कमल नमन कर

शरद कमल बघ

पवन जलद चल

बबन चमन कर


....

जमतय..जमतय.. :-p

Friday, October 24, 2008

दिवाळी अंक

2 प्रतिक्रिया
दिवाळी अंकांचे महत्त्व म्या पामराने काय वर्णावे म्हाराजा? मायबोलीवर नवे अंक विकायला आलेत.

हे जुने बघा.
मौज-०६
मायबोली-हितगुज-०१
मायबोली-हितगुज-०२
मायबोली-हितगुज-०३
मायबोली-हितगुज-०४
मायबोली-हितगुज-०५
मायबोली-हितगुज-०६
मायबोली-हितगुज-०७
बे.एरिया-स्पंदन-०५

आणि आपला सर्वांचा हा घरचा अंक आलाये की, तो ही आवर्जून वाचा.
रेषेवरची अक्षरे-०८


!!! शुभ दीपावली !!!

Thursday, October 16, 2008

एटीप्लस सेलिब्रिटी

0 प्रतिक्रिया
What makes one keep going ahead in his/her life?

तिशीत आलेली लोकं मला समजावून सांगतात, "दहा वर्षांपूर्वी मी कॉलेजातून निघाले तेव्हा असलेला उत्साह आता तसाच शाबूत असणं बऱ्याचदा शक्य नसतं". इतक्या लवकर कुणाला कंटाळा येऊ शकतो का आयुष्याचा? ज्यांना येत नाही ते कौनसी चक्कीका आटा खातात?

ऍक्टिव्ह रहाणं थांबवायचं प्रत्येकाचं वय वेगळं का असतं? ते आपल्यासाठी किती असावं हे ठरवणारे कसं ठरवतात?

दिलीपने १९४४ च्या ज्वारभाटा पासून १९५८ च्या मधुमती पर्यंत पहिली इनिंग खेळली. चांगली १४ वर्षे! कॄष्णधवल चित्रपटांचा सुपरस्टार म्हणून. रखडलेला मुगले-आझम १९६० ला आला असला तरी त्यातला दिलीप कोवळाच होता. मग जरा गॅप घेऊन सुजट चेहऱ्याने त्याने नवी इनिंग सुरू केली. १९६१ च्या गंगाजमुना, पासून पुढे दिल दिया, गोपी, राम और शाम, आदमी, करत १९७६ पर्यंत. १५ वर्षे! चेहेऱ्यावरचं वय मेक-अप खाली झाकणंही शक्य होईना झाल्यावर ४ वर्षे थांबून, प्रॉपर वॄद्ध भूमिकेत त्यानं सुरू केली ३री इनिंग. १९८१ च्या क्रांती पासून शक्ती, विधाता, मशाल, कर्मा, करत १९९१ च्या सौदागर पर्यंत. १० वर्षे!

आणि तो थांबला.

त्याला वाटलं, बस्स झालं. १४, १५ आणि १० वर्षांच्या ३ इनिंग पुरे झाल्या. यापुढे त्याचं वय किती असेल, आणि प्रकॄती किती साथ देईल याची शंका आली असावी त्याला. कुठेतरी पाकिस्तानी अध्यक्षाकडून निशाने सारखे खिताब तो घेत असताना आपण त्याला मिस करत राहिलो. मग धडपडून जाग आल्या सारखा ७ वर्षांनी तो उगवला १९९८ च्या किला मध्ये. किला आपटण्याचं सारं ’श्रेय’ स्वत:कडे ओढवून घेत तो पुन्हा मावळला. खरंतर १९९१ पासून आत्तापर्यंत प्रकॄती सांभाळून त्याला कितीतरी काम करता आलं असतं. सायरा म्हटली असेल "कायकू? भौत पैसा है अपुनके पास!". पण मग भौत पैसा तर त्याच्याकडे १९५० सालीच आलेला असेल. तो जेव्हा त्या ३ इनिंग खेळला तेव्हाही त्याला सिनेमे नाकारण्याचा रोग जडला होता असं शिरिष कणेकर म्हणतात. त्याने नाकारलेल्या चित्रपटांवर राजेंद्रकुमार ज्युबिलीस्टार झाला होता! त्यानं असं का केलं? आता २००८ ला परतणार म्हणून वावड्या उठवून आमची नाराजी कमी होणारेय असं वाटतं का त्याला?

जन्म: ११ डिसेंबर १९२२. वय ८५.
---

बाळासाहेब थकलेत म्हणून त्यांना निकालात काढणारेही थकले. पण ते अजून बोलतात. "वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही", "माझ्यासमोर गोधडीत मुतणारा पोरगा.." वगैरे. तसं भर तारूण्यातही बोलण्याशिवाय त्यांनी जास्त सक्रीय काही केलं नाही, पण तरी अजून ते उभे राहून बोलू शकतात हे ही काही कमी नाही.

जन्म: २३ जानेवारी १९२६. वय ८२.
---

मनमोहनने आडवाणींची गोची केलीय. एटीज मधे पीएमशिप मिळवून गाजवणं अटीतटीच्या लढाईत नक्की राहून जाणार.

जन्म: ८ नोव्हेंबर १९२७. वय ८१.
---

लतादीदीके बारेमे जितनाभी कहा जाये कम है. पण लेटेस्ट कधी गायली ती? यश चोप्रा द्यायचा तिला गाणी. पण दिलवाले आणि हम आपके नंतर मिळालीयेत का काही? हां, दिलसे चं होतं जिया जले. त्यानंतर? दीदी देईल अजून काही मेमोरेबल हिट्स? लेट्स होप सो!

जन्म: २८ सप्टेबर १९२९. वय ७९.
---

अब बारी आती है - सदाबहार देव साब की. मला आठवतंय, १९९२ ला एका हिंदी दैनिकात त्याची मुलाखत छापून आलेली. टायटल होतं - "चाहता हूं थोडा वक्त और मिलें". बरं वाटलेलं. काम करतोये अजून. खरंच उदंड आयुष्य मिळावं याला. काहीतरी करून दाखवेल हा. त्या मुलाखतीलाही १६ वर्षं झाली. मीच तेव्हापेक्षा १६ वर्षांनी म्हातारा झालोय, तर तो किती झाला असेल. थांबला तो? नाही! केलं त्यानं काही? खूप! कुणी पाहिलं? मुळीच नाही. कसलं दुर्दैव आहे त्याचं हे. पण आजोबाच्या वयाच्या माणसाला मूर्ख कसं म्हणावं? आजूबाजूला इतकं टॅलेण्ट आहे, त्यानं एखाद्याला हाताशी धरून काही सकस का नाही करून दाखवलं? त्याच्याच स्वामीदादा आणि हरे रामा चे कॉपीकॅट रिमेक करत शेपूट खाणाऱ्या कुत्र्यासारखा टाईम रॅपमधे का अडकला तो? की कुणाची संगत धरली तर यश/आदित्य च्या सिनेमात बुड्ढ्या दादी शेजारी दादा म्हणून सजावटीची वस्तू बनवली जाईल त्याची, ह्या भीतीने तो फ़टकूनच राहिला?

आता तर काही उम्मीद नाही त्याच्याकडून.. अजूनही १५/२० सिनेमे बनवेल तो स्वत:लाच प्रोटॅगनिस्ट घेऊन. पण तरीही..

जन्म: २६ सप्टेबर १९२३. वय ८५.
---

ऐंशीच्या घरातही डॅशिंग गाजवून सोडलं अटलजींनी. ऑलमोस्ट. कारण ते पीएम च्या खुर्चीतून पायऊतार झाले तेव्हा पावणेऐंशीचे होते. त्यानंतर बऱ्यापैकी शांतताच. पण ते प्रकृतीमुळे. मन अजूनही तरूण असावं.

कधी विशफ़ुल थिंकिंग मधे विचार येतो - मे २००९ मधे जर कुणीच आघाडी करू शकलं नाही तर अटलजी मरगळ झटकून झुल्फ़ें उडवत उभे रहातीलही पुन्हा पीएम व्हायला. आणि पॉवर च्या व्हिटामिनने प्रकॄतीला ताकद दिली तर पुन्हा म्हणतील - "हार नहीं मानूंगा मैं, रार नयी ठानूंगा मैं, कालके कपालपर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं.."

जन्म: २५ डिसेंबर १९२४. वय ८४.
---

Friday, October 10, 2008

जे जे उत्तम

0 प्रतिक्रिया
"You shouldn't let that broken jaw influence you," Hagen said. "McCluskey is a stupid man and it was business, not personal."

For the second time he saw Michael Corleone's face freeze into a mask that resembled uncannily the Don's. "Tom, don't let anybody kid you. It's all personal, every bit of business. Every piece of shit every man has to eat every day of his life is personal. They call it business. OK. But it's personal as hell. You know where I learned that from? The Don. My old man. The Godfather. If a bolt of lightning hit a friend of his the old man would take it personal. He took my going into the Marines personal. That's what makes him great. The Great Don. He takes everything personal. Like God. He knows every feather that falls from the tail of a sparrow or however the hell it goes. Right? And you know something? Accidents don't happen to people who take accidents as a personal insult. So I came late, OK, but I'm coming all the way.
Damn right, I take that broken jaw personal; damn right, I take Sollozzo trying to kill my father personal." He laughed. "Tell the old man I learned it all from him and that I'm glad I had this chance to pay him back for all he did for me. He was a good father."

Monday, October 6, 2008

शतरंज के खिलाडी

0 प्रतिक्रिया
मीर आणि मिर्झा ला हा शौक कधी जडला हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. जडला हे खरं. मित्र ते आधीपासूनच होते, योगायोगाने शौकही सुमारे एकाच वेळी जडला. मग फ़्रेण्डली कॉम्पिटिशन म्हणून त्यांनी त्या कलेतले आपापले स्किल्स सुधरावेत म्हणून प्रयत्न सुरू केले. मैत्री अजून पक्की झाली, सोबत वेळ घालवायला बहाणा मिळाला, गप्पांना विषय मिळाला, आणि डोक्याला खुराकही.

शेवटी आयुष्यात काय हवं असतं? आनंद. सुख. हेच नां? रस्त्याच्या कडेला आरामशीर लोळणाऱ्या भिकाऱ्याच्या गोष्टीसारखं - अल्टिमेटली फ़क्त सुख आणि समाधानच मिळवायचं असेल, आणि ते सहजगत्या मिळत असेल, तर त्यासाठी वेगळी फ़ाईट कशाला मारायची?, हा भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा प्रश्न - मीर आणि मिर्झानं छंदाला सगळा वेळ समर्पण करून त्यांच्यापुरता सोडवला होता.

कमर्शियल चित्रपट आणि आर्ट फ़िल्म यातला आपल्या दिग्दर्शकांनी डिफ़ाईन केलेला फ़रक म्हणजे - जर काही संदेश द्यायचा असेल, तर कमर्शिअल चित्रपट क्लायमॅक्स मध्ये किंवा नंतर प्रेक्षकांना तो वाचून दाखवतो. आर्ट फ़िल्म तो संदेश डिकोड/डेसिफ़र करायचं भलंमोठं काम प्रेक्षकांवर लादून मोकळी होते.

आयुष्यात सुख, प्लेझर, देणारे छंद किती प्रमाणात असावेत; त्या सुखापासून वंचित करणारे कष्ट किती असावेत; खरी हाडामांसांची आपण पूर्वी भेटलेली मित्रमंडळी किती असावीत; आणि मॉनिटर स्क्रीनवर सरकत जाणाऱ्या आणि नव्याने उमटणाऱ्या ओळीतून भेटणाऱ्या व्हर्च्युअल मैत्र्या किती असाव्यात - याचा तक्ताही सत्यजितदां जाता जाता देऊन जात नाहीत.

सगळे इक्विलिब्रिअमचे बॅलन्स आपण सांभाळायचे. छंदात आणि व्हर्च्युअल जगात रमायचं, तिथे लाज वाटली की परत मागे फ़िरून खऱ्या आयुष्यात इंग्रज किंवा अकील शिरकाव करत नाहीत नां याची खात्री करून यायची. पटावरचे हत्ती घोडे उंट आणि वजीर पुन्हा खुणावायला लागतात, तर वेड्या तीराच्या वेगाने पुन्हा छंदांकडे झेपावायचं. तिथले वजीर वेगळ्या चटपटीत आयुष्याची झलक दाखवतात, तिथे आपल्या इमोशन्स खर्ची घालायच्या.

आणि राजा चेकमेट झाला, की पुन्हा प्यादी मांडायची...

Thursday, June 5, 2008

एका ऑल्सो रॅनची डायरी

10 प्रतिक्रिया
त्यानं मला त्याच्या साम्राज्यात सामावून घेतलं. पण मी त्यासाठी पात्र आहे की नाही हे न बघताच? हे तर त्याच्या असूलोंके खिलाफ़ आहे नं? मारिओनं मला व्हिटोच्या सुरुवातीच्या वर्षांची जी चित्तरकथा सांगितली ती थक्क करणारी निघाली. ती तशी थक्क करणारी असेल हे माहीत असूनही ऍक्चुकल ऐकून थक्क झालेलो. खरं-खोटं, चूक-बरोबर, मोरल-इम्मोरल, ऑनेस्ट-क्रिमिनल, सगळ्याच्याच व्याख्या सापेक्ष असतात की काय?

तो इतक्या आत्मविश्वासाने कसा म्हणू शकतो की प्रत्येक मनुष्याची फ़क्त एक आणि एकच डेस्टिनी असते? त्याला जर फ़ानुची ने अडवला नसता तर त्याने खरंच किराणा दुकान काढून बायको आणि ४ पोरांसह संसार केला असता? त्यातले हे सारे सुप्रसिद्ध ’गुण’ कधी त्यानं असे ’उधळले’ नसते? मला त्याला विचारायची हिम्मत नाही झाली. त्याच्यासारख्या कर्तॄत्त्ववान आणि स्वबळावर शून्यातून साम्राज्य उभं करणाऱ्या माणसानं डेस्टिनी सारखा शब्द का वापरावा? खरंच मनापासून, की फ़क्त मॉडेस्टी?

व्हिटोच्या पूर्वायुष्याबद्दल बोलणं संपवून मारिओ पुन्हा सोलोझ्झो नं काढलेल्या कुरापतीच्या विषयापाशी येवून थांबला. मला ते सहन होईना म्हणून बाहेर आलो. जरा मोकळ्या हवेत श्वास घेऊन बरं वाटेल म्हटलं.

जवळच २००५ च्या कुठल्या तरी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचा कार्यक्रम चालू होता म्हणून आत गेलो. स्टेजवर स्टिव्ह उभा होता. म्हणे भाषण देणार नाहीये आज, फ़क्त ३ गोष्टी सांगणारेय. पोरं खूष!

पहिल्या गोष्टीत त्यानं सांगितलं, त्याच्या खऱ्या आईबद्दल, जी अविवाहित असतानाच आई झालेली. ह्याला दत्तक घेणाऱ्या आईवडिलांनी शिकवायचा प्रयत्न केलेला तरी याने शिक्षण सोडलेलं आणि गॅरेज मधे कंपनी सुरु केलेली. वयाच्या २० व्या वर्षी सुरु केलेली कंपनी १० वर्षात २ बिलियन डॉलर्सची झाली. दुसऱ्या गोष्टीत सांगितलं की त्या कंपनीतून वयाच्या ३० व्या वर्षी त्याला काढून टाकलं गेलं. मग त्याने वेगळी कंपनी काढली आणि इकडे सन्मानाने परत बोलावलं गेलं. तिसरी कथा ह्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं, आणि काही दिवसांचीच मुदत दिलेली, पण तरी तो वाचलेला... वगैरे...

पोरं एकदम प्रेरित वगैरे झालेली. मी वैतागून बाहेर आलो. मोकळी हवाही फ़ार काही बरं वाटेनाशी झालेली आता.

व्हिटो म्हटला तसंच स्टीव्हचं झालं असेल का? म्हणजे शिकत असताना त्यालाच माहीत नव्हतं पुढे काय होणार आहे ते. पण कॉलेज सोडून गॅरेजात कंपनी उघडताना त्याला त्याची ती एकमेव डेस्टिनी सापडली. मग पुढे सारं सोपंच होतं? त्याचा आदर्श ठेवून जर १००० जणांनी कॉलेज अर्धवटच सोडलं आणि गॅरेजात कंपनी सुरू केली तर त्या १००० पैकी किती जण स्टीव्ह इतके यशस्वी होतील? मला वाटतं शून्य. कारण कॉलेज सोडणं आणि गॅरेज सापडणं हे स्टीव्हला त्याच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे वाटत असले, तरी त्या टप्प्यांपेक्षा त्याचं स्टीव्ह असणं त्याच्या खरं कामी आलं. जसं व्हिटोला फ़ानुची नडला नसता तर दुसरं कुणी नडलं असतंच, आणि व्हिटोला तेवढं कारण पुरलं असतं.

स्टीव्हनं असं पकवल्यावर व्हिटोकडेही जावंसं वाटेना, म्हणून मी बाहेरच बसून राहिलो कितीतरी वेळ. वाटलं, जे व्हिटो किंवा स्टीव्ह होतात त्यांच्यासाठी किती सोपं असतं यशाची कारणं शोधून गणित मांडायला. आणि त्यात काहीही तत्थ्य नसलं तरी लोकं ऐकतात, आणि मोटिव्हेट होतात. पण त्यांना त्यांची डेस्टिनी अशी कडकडून भेटतच नाही. जे व्हिटो किराणा दुकानच चालवत रहातात, आणि जे स्टीव्ह कॉलेज सोडून गॅरेजात दुकान मांडतात त्यांचं पुढे काय होतं?

प्रयत्नवाद मोठा की दैववाद मोठा हा प्रश्न व्हिटो किंवा स्टीव्हला विचारायलाच नको होता असं एकाएकी वाटून गेलं. त्यांची उत्तरं काय असणार हे मला आधीच माहीत असायला पाहिजे होतं. हा प्रश्न विचारायला पाहिजे त्या साऱ्या ’ऑल्सो रॅन’ कॅटेगरीतल्यांना - ज्यांनी प्रयत्न करून पाहिले पण जे कुठेच पोहोचले नाहीत. संजय मांजरेकर, प्रवीण आमरे, नरेंद्र हिरवाणी, सुमन कल्याणपूर, सुरेश वाडकर, राधा मंगेशकर, अमितकुमार, नितीन मुकेश, जॉन मॅथ्यू मॅथन अशांचं पुढे काय होतं? हे लोक उरलेलं आयुष्य स्वाभिमानानं जगतात का? त्यासाठी फ़्युएल म्हणून लागणारी एनर्जी ते कुठून आणतात?

की मी मोकळ्या हवेत बसून हे नसते उद्योग करतो आहे? मी परत आत गेलं पाहिजे? व्हिटो कडे किंवा स्टीव्ह समोर. कुणातरी एकासमोर उभं रहायचं, त्याचं अफ़ाट व्यक्तिमत्त्व, अचाट पराक्रम आणि अचीव्हमेण्ट्स पाहून थक्क व्हायचं, प्रेरित व्हायचं, आणि स्वत:च्या लाईफ़ मध्ये फ़ाईट मारायची. मग लागला टोला तर लागला, आपणही तसेच यशस्वी. बॅट नीट घुमवता आली तर तेंडुलकर नाहीतर मांजरेकर. प्रयत्न करत रहायचा - लॉटरी लागली तर मंगेशकर नाहीतर कल्याणपूर. असं इतकं साधंसोपं बाळबोध असतं का हे सारं? की याही पलीकडे काही अगम्य आहे या साऱ्यात?

व्हिटो म्हणतो तशी प्रत्येकाला एक डेस्टिनी असेलही. पण ती दर मिलीयन लोकांत एखाद्यालाच कडकडून भेटते आणि उचलते. बाकीचे नऊ लक्ष, नौव्हॅण्णो हजार, नौशेनौव्हॅण्णो मात्र ’ऑल्सो रॅन’ बनून स्टीव्ह किंवा व्हिटोच्या दरबारात उभे राहून मोटिव्हेट होत रहातात, आणि घरी जाऊन टोला बसतोय का हे व्यर्थ आजमावत रहातात.

Saturday, May 24, 2008

थरार..

13 प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपर्यंत काही नव्हतं.

रोजचं रूटीन लाईफ़ पेशंटला खाऊ घालायला केलेल्या बिनातिखटाच्या बिनफ़ोडणीच्या बेचव खिचडीसारखं.. तसंच चमच्याचमच्यानं खाणं चालू होतं. त्यात बायको माहेरी गेलेली, बाहेरचा उकाडा. आणि भाजून काढणारं वहाणारं वारं. मनोरंजन न करण्याची टीव्ही नं त्याच्या आईची घेतलेली शप्पथ. आणि वर ताण म्हणून दुकानात काहीच काम नसणं. नुसतं बोअर+बोअर.

अशात कंटाळ्याला अजून जुळी पिल्लं झाल्यासारखी अजून कंटाळा म्हणून ही सुरुवातही अशीच मंद काहीशी. तिथे त्याच्या मुलीचं लग्न चालू होतं. मग खूप वेगवेगळे लोक येऊन गेलेले. बरेचसे बाहेर लॉनवर नाचत खात पार्टी करत. काही आत भेटून गेलेले - पाकिटात पैसे घेऊन, आणि मनात अडचणी आणि अपेक्षा घेऊन. त्याचं त्यांच्या अडचणी सोडवणं चालू होतं, पण माझं काही त्या पार्टीत मन रमेना म्हणून बाहेर आलो.

पुन्हा आत गेलो तर त्याचं त्यांच्या अडचणी सोडवणं पुढे चालूच. आता मात्र मी उत्सुकतेने त्याला न्याहाळू लागलेलो. साधारण अंगकाठीचा, बेताच्याच उंचीचा - तरीही इतका सुलझा हुवा, कन्व्हिंन्सिंग, जरब बसवणारा.

पुढे जे होत राहिलं ते असे धक्के देणारं होतं की ते धक्केच हवेहवेसे वाटायला लागले मला. त्याला भेटायला आलेल्या एकाची अडचण सोडवण्यासाठी याने एका ६,००,००० डॉलर्स किंमतीच्या वेल्व्हेट ब्लॅक कलरच्या रेसच्या अबलख घोड्याचा शिरच्छेद करवला! अंगावर आलेला थरार काटा, आणि बेचव चमचाभर खिचडीचाही लागलेला तिखटजाळ ठसका - इतकंच आठवतंय फ़क्त.

नंतर स्वत: कॉर्लिऑनच्याही पाठीवर ५ गोळ्या झाडल्या गेल्या, ल्युका ब्रासी चा गळा चिरला गेला, आणि क्लेमेन्सोच्या माणसानं पोरगेल्याशा पॉली गॅट्टो ला उडवलेलं...

पुढे अजून काय वाढून ठेवलंय याची उत्कंठा रोज बसप्रवासाची वाट पहायला लावते. घर ते दुकान आणि दुकान ते घर हे रोजचे २ बसप्रवास इतकाच ठरलेला वेळ मिळतो मला त्यांच्यासारख्या माझ्या नव्या ग्रेट मित्रांसाठी...

Saturday, April 26, 2008

श्री च्या श्रीमुखात भजं

7 प्रतिक्रिया
परधानजी, म्याच चं काय जालं वो?

कुनाची म्याच म्हाराज?

आवो कोन्च्यातरी डेअर्डेव्हिल्स ची कोन्च्या तरी टायगर्स नायतर लायन्स नायतर इगल्स नायतर नाईट रायडर्स शी झाली असंलच ना वो?

जाऊंद्या म्हाराज. आपल्या पिढीला नाई लक्षात ऱ्हायचं कोन कुनाकडून आनि कुनाविरुद्ध खेळत्यात ते.

खरंय, परधानजी, आपल्या ल्हानपनी कसं सोपं होतं. भारतातले पोरं भारताच्या बाजूने खेळायचे. विंग्रजांचे त्यांच्या बाजूने. खेळ पहायला चेकाळून मजा यायची - कारन आपनबी भारतीय! म्हून मंग आपल्या पोरास्नी सपोर्ट करायचो.

म्हाराज, आता खेळात पैका असतो, आपन मनोरंजन म्हून पाहायचं.

परधानजी, क्रिकेट आमी कधी खेळ म्हून पाहिलंच नाही वो. आम्ही देसभक्त म्हून पाहिलं. आत्ता २ महिन्यांपूर्वी कांगारूंनी तमाशा केला तवा आपन पेटलो होतो नां? ते खेळावरचं प्रेम म्हून की देशावरचं म्हून? मला वाटतं देशावरचं. आपला भारत नव्या सेन्च्युरीत सुपरपावर होनार अस्ताना कोनाची हिम्मत कशी होते आमाला घालूनपाडून बोलायला - म्हून चिडलो व्हतो नां?

व्हंय म्हाराज.

मंग आता हे पोरं आपापसात खेळताना कसं पहायचं परधानजी? आपलाच वीरू आपल्याच झहीरला कुटून काढत्योय त्यो?

पन म्हाराज, पूर्वी बी रनजी होतंच की आपल्याकडे?

आवो त्ये कोन कदी पहायचं परधानजी? आनि त्या पायी कधी मुंबईच्या सपोर्टर्सनी दिल्लीवाल्यांशी दुस्मनी घेतली का? ह्या आयपीएल नं तर देशाचं तुकडं पडायचं की हो.

असं काय नाही म्हाराज. खेळ हाये तो. पोरं खेळतात. भांडतात कधीमधी. असं व्हायचंच.

म्हंजे? काय झालं?

म्हंजे एक वाईट बातमी हाये म्हाराज.

आता काय झालं? सायमंड पुन्हा पचकला का तिच्या मायला..

न्हाई म्हाराज. आनखी वाईट हाये. सायमंडसंगं ज्या हरभजन साटी आपन भांडलो त्या भज्जीनं आपल्याच श्रीशांतच्या कानाखाली हाणलीये, आन ती बी लाईव - भर मैदानात.

???

म्हाराज.. अवो बोला काई.

परधानजी. म्याच चं जाऊ द्या. ते थोबाडीत मारल्याची आनि श्रीशांत ढसाढसा रडल्याची डि.वी.डि. मिळते का पहा. आनि त्या प्रोस्ताहन देनाऱ्या पोरी नाचत्यात ना त्ये बी आना. आता आपनबी कोडगेपनानं खऱ्या खेळाचा आनंद लुटू. देसप्रेम गेलं चुलीत.

आता कसं म्हाराज. असा ऍटिट्यूड पायजे - स्पोर्टिव!! थांबा, आलोच मी डिवीडि घिउन.

Monday, April 21, 2008

मैं भी, तबसे खडा इसपार..

11 प्रतिक्रिया
काळ्यापांढऱ्या बिनरंगी पडद्याचं रुप ते काय? पन्नास वर्षांपूर्वीच्या चित्रपटांचं बजेट ते कितीसं? आणि त्यासाठी वेगवेगळ्या सत्राशेसाठ गोष्टी कराव्या लागत असताना मिळणारी मिळकत ती कितीशी? पण तरी स्वत:च्या अंगात कला आहे, आणि ती कुणासमोर टिमकी वाजवायची म्हणून नाही, पण कोंडून ठेवता येत नाही म्हणून, तिला मुक्त आविष्कार दिल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून, काही दिग्गज एकत्र येतात, आणि - "साकारतात एक भव्यपट" असं नाही म्हणता येणार, तर फ़क्त सांगतात एक गोष्ट. पण आपल्या जाणिवांचा, दॄष्टी आणि श्रुतीचा असा काही ताबा घेऊन, की त्या २/अडीच तासांनंतर आपण एक मोट्ठा श्वास घेतो, नि:श्वास सोडतो, आणि कळतं, अरेच्चा, गेल्या अडीच तासात मी कितीतरी वेळ श्वास रोखून धरलेले होते, निम्म्याने कमी श्वास घेतलेले होते!

श्वास रोखून धरणं फ़क्त थरारक प्रसंगांनाच नाही, साध्यासुध्या प्रणयगुज करणाऱ्या प्रसंगांनाही, डोळे मिटून घेऊन कानांत ओतप्रोत भरून घ्यावीत अशी गाणी आणि संगीत ऐकताना डोळे मिटल्याने जे निसटलं त्याच्या चुटपुटीमुळे सुद्धा. उग्रनारायणच्या रागाला, स्वाभिमानाला, तरीही मधेच पघळून त्याने पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला, आणि त्या मैत्रीला थंडपणे धुतकारणाऱ्या आनंदबाबूंच्या रिझॉल्व्ह आणि इण्टिग्रिटीला..

स्वत:चं मन साफ़ असेल, आणि इरादे नेक असतील तर कुणाची काय भिती? हा आनंदबाबूंचा ऍटिट्यूड रोअर्कच्या जवळ जाणारा होता कां? त्याने 'तुम्हारा नाम क्या है?' विचारल्यावर 'मधुमत्ती' असं उत्तर देण्यापूर्वी तिने डोळे मोट्ठे करून पापण्यांची केलेली हलकीशी पिटपिट ही संपूर्ण हिंदी चित्रपटसॄष्टीतील आद्य पिटपिट होती कां? शिरीष कणेकरांना कुणीतरी 'अब्बे दिलीपच्या चमच्या' म्हणून हिसकारल्यावर खुदुखुदू हसणारे आपण आत कुठेतरी स्वत:ही दिलीपचे चमचेच असतो कां? तसं नसतं तर सैगलच्या आणि शाहरूखच्या २ देवदासांमधला दिलीपचाच देवदास फ़क्त अजूनही सक्सेसफ़ुली रडवतो कां?

शाहरूख आणि सरोज खॉं बाईंनी शाहरूखला ॠषी कपूरच्या वेषात नाचवून, आणि पिटात सुभाष घै दाखवून, ओसो हा कर्ज चा रिमेक आहे हे आम्हांला कानीकपाळी ओरडून सांगितलं तरी शेवटचा सीन पहाताना खॉं बुवाने ही मधुमती ढापलीये असं वाटून त्यांच्या अक्कलशून्यतेची कीव का येते? ६ महिन्यांपूर्वीचा ओसो आणि वीसेक वर्षांपूर्वीचा कर्ज पहाण्याची 'अर्ज' आतून येत नाही, पण ५० वर्षांपूर्वीचा मधुमती पहाण्याची 'अर्ज' थोपवता का येत नाही? ऑर्कुटवर व्हिडिओज चिकटवताना पहिले सलग सुचणारे ७/८ व्हिडीओज कॄष्णधवलच का निघावेत? मग त्यानंतर आठवणारं एखाद-दुसरं रंगीत गाणं डकवून आधीच्यांची शोभा घालवू नये अशी तीव्र उबळ का यावी? माझ्या वयाच्या मित्रांना एकमेकांशी मेटॅलिका की बॉनजोव्ही की असलं काहीतरी वरून वाद घालताना पाहून आपला चेहरा मात्र मकरंद अनासपुरेसारखा गावाकडचा का असावा, आणि आपल्या वयाला न शोभणाऱ्या आपल्या मनात मात्र "आनंदबाबू........." ची दऱ्याखोऱ्यांत घुमत जाणारी आरोळी आणि "मैं तो कबसे खडी इसपार, ये अंखियॉं" च का वाजत असावं?

काश.. मलाही एकदा हलकीशी पिटपिट करून तिच्यासारख्या भाबडेपणाने माझ्याच प्रश्नांची उत्तरं देता आली असती!

Thursday, April 3, 2008

जेव्हां माझ्या ego च्या हातून माझ्या id चं मानगूट सुटतं तेव्हां.

8 प्रतिक्रिया
यशोधरा, तू खो दिल्यावर तुला ’थॅंक्स, बट नो थॅंक्स’ म्हणून कट मारायची जबरदस्त हुक्की आली होती. पण मागे अभिजित बाठेनी मेघना यांना तसा कट मारायचा प्रयत्न केला, आणि त्या प्रयत्नात तो २ पानी कॉमेण्ट लिहून बसला. तसं माझं होवू नये, म्हणून खो घेऊन थोडक्यात विषय संपवावा म्हणून लिहीतोय.

id म्हणजे मानवी मनाचा तो पैलू, जो उफ़ाळून येणाऱ्या इच्छा, स्थलाकालाचं आजूबाजूच्या परिस्थितीचं कसलंही बंधन न मानता, फ़क्त पूर्ण करून/करवून घेऊन ताबडतोब सुख(pleasure) मिळवू इच्छितो. इतर सर्वसामान्य नॉर्मल लोकांच्या बाबतीत तहान, भूक, लैंगिक इच्छा ह्यामध्ये सामाविष्ट असाव्यात. मला वाटतं, माझ्याबाबतीत ब्लॉगिंगने त्या यादीत स्थान पटकवलंय. "आता लिहायचंच" म्हणून मन डोकं कोरत रहातं विषय शोधण्यासाठी - आणि विषय सुचला की त्याची वाक्यं झरझर मनात तयार होवून लिहील्याखेरीज चैन पडणार नाही अशा स्थितीत आणून सोडतात. पब्लिश केल्यावर सुख मिळाल्याचं समाधान चेहऱ्यावर झळकतं. कॉमेण्ट्स वाचणं, लिहीणं हे ही पुन्हा त्याच id ने करवून घेतलेली कॄत्यं.

असा id बेफ़ाम ताकदवान घोड्यासारखा चौखूर उधळत सुटला की काही पोस्ट्सनंतर माझ्या ego ला भान येतं. आजूबाजूला सारे आर्किटेक्चर डिस्कस करताहेत, कुणी संध्याकाळी उशीरापर्यंत दुकानात थांबून कोडिंग करतंय, कुणी घरी बायको ओली-बाळंतीण असताना फ़ुलटाईम नोकरी करून स्वत:च्या उच्चशिक्षणासाठी अभ्भ्यास करतोये. ego ला हे पाहुन मुस्कटात मारल्यासारखं होतं. गोगलगायीला शंखात जाऊन बसणं सोपं असतं, माझ्या ego ला id वर काबू मिळवून शंखात कोंबणं महाकठीण काम ठरतं. पण तो ते सिन्सिअरली करतो. id च्या मुसक्या बांधून id ला reclusiveness च्या शंखात घेऊन जातो -- id पुन्हा बेलगाम होईपर्यंत.. ego ला फ़ारच गिल्टी वाटलं असेल तर id ने पब्लिश केलेली पोस्ट्स तो येऊन ’सेव्ह ऍज ड्राफ़्ट’ करून जातो - कधीकधी ब्लॉगचं नावही बदलून ठेवतो. जणू तसं केल्यानं id ला ते पुन्हा सापडणारच नसतात!

माझा id आणि माझा ego - २ कारणं. मी ब्लॉग लिहीण्याची आणि न लिहीण्याची.

मी कुणालाही खो देत नाहीये, ज्याला पाहिजे असेल त्याने/तिने स्वेच्छेने घ्यावा.

Friday, February 8, 2008

व्हॅलेण्टाईन स्पेशल!

14 प्रतिक्रिया
हा सिनेमा चालेल की नाही, माहीत नाही. कदाचित नाहीच चालणार. त्यात राजस्थान साईडकडून होऊ घातलेला कडाक्याचा विरोध वगैरे आधीच सेटींग झालंय. आपल्यालाही आपल्या खिशातले पैसे खर्च करून जलालुद्दीन अक्कब्बरची श्रीमंती पहायची तशी इच्छा नव्हती, पण केवळ आपल्या आशुतोषने काढलाय, म्हणून पहायला जाणार - बस्स. ऍश किंवा हॄत्तिक साठी सिनेमा पहायला जावं असे आता त्यांचेही दिवस राहिले नाहीत आणि आपलेही..

पण या साऱ्या गदारोळातून चमकतो तो सोनू निगम! ’दिल चाहता है’ च्या ’तनहाई’ पासून ’कभी अलविदा’ च्या टायटल-सॉंग, आणि ’ओम शांती ओम’ च्या ’तुमको पाया है तो जैसे’ मार्फ़त इथपर्यंत! हा गडी तरूणच होत चाललाये जसा! बाकी पब्लिक सिनेमातली उरलेली ९ गाणी सो-सो गातं, आणि हा बेटा फ़क्त एकच दहावं असलं जीव ओतून गातो, की ऐकणारा ९ वेळा ’नेक्स्ट ट्रॅक’ चं बटन दाबून पुन्हा पुन्हा याचाच आवाज ऐकू इच्छितं!

ह्या अनावश्यक प्रस्तावनेनंतर :

Get this widget | Track details | eSnips Social DNA


व्हॅलेण्टाईनच्या फ़्रेण्डली शुभेच्छा - गो, फ़ॉल इन लव्ह!

Thursday, February 7, 2008

थॅंक्यू मिस्टर गॉड!

15 प्रतिक्रिया
मित्रमैत्रिणींनो,
तुमचं कधी असं झालंय, की एखाद्या दिवसाची सकाळच इतकं प्रसन्न रूप घेऊन येते, की उठल्याबरोबर एक मस्त स्माईल येतं कुठूनतरी आपल्या चेहेऱ्यावर. लगे रहो मधली जाह्नवी जसं ते मुक्तहस्ते वाटते ना, तसंच.

पुरेशी झालेली झोप, कालच कटिंग करवून आल्याने कानाला छेडणाऱ्या झुल्फ़ांपासून झालेली सुटका, मस्त गरम पाण्याने केलेली आंघोळ, एफ़ेम वर ऐकलेली "ओ सजना" ची, किंवा "रहे ना रहे हम" ची लकेर - किंवा दुसऱ्याकुणाकडून अनपेक्षित मिळालेलं स्माईल - यापैकी काहीही कारण असू शकतं अशा प्रसन्न सकाळचं! :)

आणि मग अशा सकाळी मन एक नवीन आयुष्य जगायची सुरुवात करतं. त्याची काल रात्रीपर्यंत छळणारे निराश, फ़िलॉसॉफ़िकल, काळवंडणारे विचार, मानापमानाच्या आणि संशयकल्लोळाच्या निगेटिव्ह आठवणी यांपासून अचानक सुटका झालेली असते. आणि रंजले+गांजले या कॅटेगरीत अगदी मोडणारं ते कालचं मन आज सकाळी मात्र अल्लड हसऱ्या गोंडस मुलासारखं उत्साही असतं. तो उत्साह इतरांना वाटायलाही उत्सुक असतं. कारण, "एन्थुझिआझम ईज कॉण्टॅजिअस" यावर त्याचा आता पूर्ण विश्वास असतो.

सकाळच्या उगवत्या कोवळ्या सूर्याला घराच्या बाल्कनीतून, बसच्या किंवा कारच्या खिडकीतून स्माईल देवून, उजव्या हाताची बोटं भुवयांच्या मध्यावर टेकवून नमस्कार करून मोठ्याने म्हणावंसं वाटतं - "थॅंक्यू मिस्टर गॉड! काल रात्रीच्या भीतीदायक स्वप्नांतून अलगद वाचवून अजून एक नवाकोरा दिवस जगण्यासाठी बोनस म्हणून दिल्याबद्दल, थॅंक्यू!"

Friday, February 1, 2008

तो : हा आणि मागचा

11 प्रतिक्रिया
आणखी एका वर्षाचा आणखी एक महिना संपला. कॅलेंडरची पानं उलटवणं इतकं नियमाचं झालंय की जणू ते काम दर दोन दिवसा आड करतोये असं त्याला वाटून गेलं. तो चमकलाच. लहानपणी खिळ्यापर्यंत हात पुरायला लागायच्या आधीच खुर्चीवर चढून कॅलेंडराचं पान बदलायचं काम त्यानं मिळवलं होतं. तेव्हा काय अप्रूप वाटायचं - येत्या नव्या महिन्याच्या त्या नव्याकोऱ्या पानाकडे पहाताना. आणि आता ही अनामिक हुरहूर. कंटाळा नाही, पण असेच दर दोन दिवसा आडच्या वेगाने आपण पानं उलटत राहिलो तर किती पानं आणि कॅलेंडर्स बदलू? त्याने मनातल्या मनात एक १२ चा पाढा अर्धवट म्हणून पाहिला - आणि पुन्हा तो दचकल्यासारखा थांबला. गुणाकाराचं उत्तर फ़ार मोठं न आल्याने असेल. पण मग ते किती मोठं आलं असतं म्हणजे त्याच्या बेचैन मनाला समाधान मिळालं असतं - तो आकडाही त्याला सुचेना. उगवत्या आखूड महिन्याच्या शेवटच्या तारखेवर नजर स्थिरावून त्याने त्या दिवशी त्याची मन:स्थिती कशी असेल याची कल्पना करून पाहिली. त्यातूनही फ़ारसं काही उत्साही चित्र न दिसल्याने त्याने शांत डोळे मिटून पडून रहायचं ठरवलं.

निसटून चाललेल्या वेळात आणि दिवसांत खूप काही कसं करायचं याची त्याला पूर्वी काळजी असायची. पण तो जितका स्थिरस्थावर झाला तितकी त्या निसटत्या वेळेची काळजी त्याला निष्क्रिय करीत गेली. पायावर चढलेला मुंगळा कागदाच्या चिठोऱ्यावर चालून येवू देवून मग हलकेच दूर झटकून टाकावा; तशी कसलीही उरलीसुरली महत्त्वाकांक्षा निरर्थक वाटल्याने त्याने अंगावरून दूर झटकलेली होती. तिने जाताना स्वप्नं, उमंग, तरंग, आशा, उत्सुकता साऱ्यांना सोबत घेऊन जावं अशी त्याची अपेक्षा नव्हती - पण तसं झालं होतं खरं. आणि आताशा महिन्यांची पानं उलटताना त्याला त्यांच्याही जाण्याचं वैषम्य वाटेनासं झालं होतं.

भीमसेन जोशींच्या टीव्हीवर पाहिलेल्या एका गाण्याचे बोल - ’याचसाठी केला होता अट्टाहास..’ उगाच आठवून तो त्या अट्टाहास शब्दापाशी अडखळला. कुणालाही कशासाठीही अट्टाहास का करावासा वाटावा? एखाद्या कंपनीचा मॅनेजर हा त्या कंपनीला खूप फ़ायदा व्हावा म्हणून जिवाचा आटापिटा का करतो? मिटींगमध्येही लक्ष न लागल्याने त्याला समोर बसलेल्या मॅनेजरकडे पाहून कुतूहल वाटलं. आपल्याला हे जे काही वाटतंय, ते म्हणजे विश्वाच्या पसाऱ्यात आपल्या निरर्थकतेचा आणि क्षणभंगुरतेचा झालेला साक्षात्कार आहे, असं काहीसं गोड त्याला वाटायला लागलं होतं. म्हणजे बुद्धाला बोधिवॄक्षाखाली जे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ते साधारण ह्याच जातकुळीतलं असावं असंही गोड वाटून गेलं. पण उगाच चाळा म्हणून हातातलं काम सोडून याबद्दल शोधताना आपल्याला हे जे वाटतंय तो एक आजार आहे; असलं सांगणाऱ्या विकीची त्याला तिडीक आली. मग ब्राऊजर बंद करण्यासोबत त्याने पीसी शट-डाऊनही करून टाकला होता.

गेल्या जन्मी असं नव्हतं. म्हणजे तो होता असाच, पण तसं असण्यामागे जगाला पटेलसं सॉलिड रिझनिंग होतं. तो मोठ्या खानदानातला लाडावलेला शेंडेफ़ळ होता. उच्चवर्णीय जमिनदाराच्या कुटुंबात जन्मून परदेशात शिक्षण घेऊन आला होता. आणि सगळं मातीमोल वाटून, स्वत:ला निष्क्रियतेच्या आणि सर्वनाशाच्या वाटेवर झोकून देताना त्याला एक आर्त दु:खी मजा वाटली होती. त्यातून त्याला सावरणाऱ्यांना दूर ढकलून देवून क्रॅशलॅंडिग करायला जमिनीकडे झेपावणाऱ्या विमानासारखा तो अनावर झालेला होता. पारो न मिळाल्याच्या, दिवाळी साजरी करावी अशा जोशात साजऱ्या केलेल्या दु:खात, ती न मिळाल्याचा त्याला एक सुप्त कमालीचा आनंदही होता. ती न मिळाल्याचं कारण वाजवून सांगून तो स्वत:च्या विनाशाची ती वाट राजरोस चालू शकत होता. त्यापासून त्याला थांबवू पहाणाऱ्या चंद्रमुखीचा अडथळा तसा त्याच्या इच्छेपुढे मामूलीच होता. देवदास हा घटनांचा दुर्दैवी बळी नसून ती फ़क्त एक प्रवॄत्ती आहे, हे चंद्रमुखीला कळलंच नाही कधी. पारोला ते हलकंसं कळलं असावं.

पारो चुकून मिळाली असती, आणि दोन्ही घरच्यांनी राजीखुशीने धूमधडाक्यात लग्न लावून दिलं असतं, तर निष्क्रिय, आणि उताराकडे धाव घेणाऱ्या मनानं त्या आनंदी जीवनाचं चॅलेंज कसं पेललं असतं - हा भितीदायक विचार त्याने गेल्या जन्मी निग्रहाने दूर ठेवला होता. पण या जन्मी त्याला त्याच परिस्थितीनं गाठलं, आणि कसलीच वाट न सापडल्याने, हरवून तो त्याच्या आनंदी आयुष्यात कॅलेंडरची पानं उलटवत राहिला.

Tuesday, January 15, 2008

ती

17 प्रतिक्रिया
ती आजही नेहमीसारखी लवकर उठली. उठलंच पाहिजे ना, याचा डबा करायचा असतो, सोबत मुलांचाही. जरी दोघे त्यांच्या शाळांना उशीराने जाणार असली तरी तिन्ही डबे एकदाच बनवलेले परवडतात. मग ती तिच्या दुपारच्या जेवणासाठीही २ पोळ्या आणि भाजी होईल अशा बेताने एकदाच स्वयंपाक करते. परात, पोळपाट, लाटणं, तवा पुन्हा पुन्हा घासावे पुसावे लागत नाहीत या हिशेबाने.

त्याला आंघोळीला टॉवेल आणि त्याचे कपडे बाथरूमपर्यंत पोहोचवून ती मुलांच्या बेडरूमकडे वळली. दोघांना हाका मारून उठवलेलं आवडायचं नाही - म्हणून जवळ बसून कुरवाळून ’माझ्या शोन्या - राजा’ करत जागं करून ती भाजीच्या गॅसकडे धावली. वेळेत गॅसपर्यंत पोहोचू शकल्याचा तिला आनंदच झाला.

तो आणि मग तासा-दोनतासांनी ते दोघे आपापले डबे आणि बॅग-दप्तरं घेऊन गेल्यावर ती जराशी खुर्चीत विसावली. आठवणीने साऱ्या वस्तू आणि गॄहपाठाच्या वह्या शोधून बॅगे-दप्तरात भरून वेळेत तयार करून हातात देऊ शकल्याचं तिला समाधान वाटलं; तोच फोन खणखणला. न करवदता सहजतेने ती पुन्हा धावली.

"हॅलो, अगं मी काल आणि आजही तुला सांगायचंच विसरलो होतो. आत्ता विकासने फोन केला आणि आठवलं मलाही."
"काय रे?"
"अगं आज संध्याकाळसाठी मी मित्रांना घरी बोलावलंय जेवायला. आणि जरा ड्रिंक्सही. तर तू थोडी तयारी करतेस का? आणि मुलांनाही आईंकडे पोहोचवशील, प्लीज?"
"अरे करेन नां, त्यात काय एवढं?"
"गुड. चल मला मीटिंग आहे आता, बाय!"
"बाय."

तिने लगेच उत्साहाने संध्याकाळची तयारी सुरू केली.

घर आवरून स्नॅक्ससाठी बटाटे उकडवून ठेवून ती वेळेवर मुलांच्या शाळेकडे निघाली. त्यांना आईकडे पोहोचतं केलं, पण बसायलाही वेळ नव्हता तर "आई, मी येईन अगं रविवारी. आत्ता जाऊदे" असं म्हणून जिन्यातूनच माघारी फ़िरली. झपझप पावलं टाकत ती घरी पोहोचलीही.

सारी संध्याकाळ मग मजेत गप्पांत गेली. तिला किचनमधून जरा जास्तच आतबाहेर करावं लागलं पण तिने ते आनंदाने केलं. मित्रांसोबत हसतखेळत वेळ घालवणं त्याला आवडतं हे पाहूनच तीही समाधानी होती.

रिकाम्या झालेल्या प्लेट्स उचलून आत नेताना त्याच्या नव्यानेच झालेल्या एका मित्राने तत्परतेने उठून उरलेल्या प्लेट्स आत न्यायला तिला मदत केली. "अरे, असू दे नां, मी परत येवून नेते" असं तिने म्हटलेलं न ऐकून त्याने तिच्यामागून येवून प्लेट्स सिंकमध्ये ओतल्या. एवढ्या ग्रूपमध्ये असूनही फ़क्त पेप्सीच पिणारा तो बाकीच्यांपेक्षा वेगळा होता. ओळख झाल्यापासून तीन-चार भेटीतच त्याचा मनमिळावू स्वभाव आणि आपुलकी तिला जाणवून गेली होती. नवऱ्याने तिच्या केलेल्या थट्टेत जेव्हां त्याचे बाकी सारे मित्र हसून दाद द्यायचे तेव्हा हा मात्र न हसता तिच्याकडे बघायचा. नजरेने तिच्या चेहऱ्यावर न जाणे काय शोधायचा? पण ती ही त्या थट्टेवर जोरात हसून त्या नजरेतल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायची.

प्लेट्स ठेवल्यावर तो जरासा रेंगाळला. त्याला बाहेर ग्रूपमध्ये जास्त करमत नव्हतं असं दिसलं. त्याच्या स्वभावाच्या कुतूहलातून किंवा उगाच काहीतरी बोलायचं म्हणून तिनं विचारलं, "काय मग भावोजी, मला वहिनी कधी आणणार?" प्रश्न विचारून झाल्यावरही २ सेकंदात उत्तर न आल्याने तिने वळून त्याच्याकडे बघितलं तर त्याचे डोळे भरून आल्यासारखे तिला वाटले. त्याच्या नजरेवर तिची नजर खिळली गेली असताना तो म्हणाला, "सगळेच जण मला हा प्रश्न विचारतात, पण प्लीज निदान तुम्ही तरी विचारू नका कधीच." आणि तो बाहेर जायला वळाला.

काय करावं हे न कळून पाठमोऱ्या त्याच्याकडे वळून ती थिजून खिळलेली फ़क्त उभी राहिली...

सकाळच्या घाईत ती पोळ्या, भाजी, टॉवेल, कपडे, मोजे, ’शोन्या-उठा’, गृहपाठ, बालभारती, पेन्सिल, टोकयंत्र, डबे हे सारं - आज यंत्रवत, पण नेहेमीच्याच घाईने करत राहिली. तिघे गेल्यावर तिने दार जरा जोरात बंद करून खुर्चीत बसकण मारली, आणि का कोण जाणे येणाऱ्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तिचा संसार सुखाचा होता. नवरा मुले चांगली प्रेमळ आणि सद्गुणी होती. लग्न तर दोघांनी व्यवस्थित कॉलेजात असताना प्रेमात पडून, आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता केलं होतं. मग हे काल आणि आज मध्ये अचानक काय झालं - तिला कळेचना.

मनात उठणाऱ्या एका कळेबरोबर तिचं मन जळत होतं -

’कभी तनहाईयोंमे यूं, हमारी याद आयेगी..
अंधेरे छा रहे होंगे, के बिजली कौंध जायेगी..
ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यारकी दुनिया,
न फ़िर तू जी सकेगा और, न तुझको मौत आयेगी..’

आणि मग तो क्षण, तो तास, तो दिवस.. महिने, वर्षं ती होरपळत राहिली.. फ़क्त होरपळत राहिली..

*****

(सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीत वाचलेल्या रोहिणी भट साहनी यांच्या एका कथेचे, जसे आठवेल तसे, मराठीतून मराठीत स्वैर रूपांतर)

Sunday, December 2, 2007

द ईफ़ेक्ट ऑफ़ द बटरफ़्लाय ईफ़ेक्ट

12 प्रतिक्रिया
ब्लॉगवर लिहीणाऱ्याला वाटतं की तो लय भारी आणि जगावेगळं लिहीतोये, पण वाचणारे मात्र हे पुन्हा आधीसारखंच झालंय हे सुजाणपणे ओळखून सुस्कारा सोडतात - ह्या तक्रारीतलं तथ्य उमगतंय, मी 'ऍज अ वाचक' जेव्हा इतर काही ब्लॉग्ज वाचतो तेव्हा असे सुस्कारे सोडतही असेन, पण मग "अर्र मी पुन्हा आधीचंच गुऱ्हाळ पुन्हा लावून दुसऱ्या कुणाला सुस्कारा सोडायच्या अवस्थेजवळ तर घेउन जात नाहीये नां" ही अस्वस्थता दरवेळेसच नवीन पोस्ट लिहीण्या आधी कॉन्शस करत असेल तर....

तर च्यामारी झक मारायला मी टोपणनावाने लिहीतो आहे का? असे सुस्कारे, इशारे, निषेधाची पत्रं आणि %&$*&^%$#!#^%$&*^$#%%!!!!!! च्या सांकेतिक भाषेत लिहीलेल्या शिव्या माझ्या अंगाला घट्ट चिकटून बसू नयेत म्हणून तर हा ब्लॉग या नावाने आहे नां? आणि तो 'स्वान्त सुखाय' असल्याने त्याची परिणिती सुस्काऱ्यांत होते की वाहवांत - इस्से मुझे क्या?

असं काहीसं थातुरमातुर स्वत:ला समजावून आंजारून गोंजारून पुन्हा पोस्ट लिहायला प्रवृत्त केलं. म्हटलं असू दे - 'तू नुकत्याच पाहिलेल्या एका विंग्रजी चित्रपटावर पोस्ट लिहीणं' आत्ताच काही दिवसांपूर्वी पार पाडलेलं असलं तरी - पुन्हा तू दुसऱ्या एखाद्या चित्रपटावर लिहील्याने ब्लॉगला विंग्रजी चित्रपटांबद्दल फ़ुकटात समीक्षा लिहिणारा ब्लॉग म्हणून शिक्का बसणार नाहीये, आणि तसा बसला तरी तुला घम वा पस्तावा करण्याचं काहीएक प्रयोजन नाहीये!

यावेळेसचा चित्रपट : द बटरफ़्लाय ईफ़ेक्ट
यात आवडलेलं : बरंच काही - पण शब्दांत कितपत लिहीता येईल याची खात्री अजून तरी आलेली नाही..

पॅरॅलल युनिव्हर्सेस बद्दल पूर्वी वाचलेलं - म्हणजे एकाच वेळेस आपलं आहे अशीच (वेल, जवळजवळ अशीच) अनेक जगं अस्तित्त्वात आहेत - तिथे थोड्याफ़ार फ़रकाने सारख्याच घटना घडताहेत. म्हणजे एका जगात शिवाजी महाराज अफ़झलखानाला मारू शकले नाहीत, दुसऱ्यात कोलंबसाचं ते जहाज किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच बुडालं, तिसऱ्यात टायटॅनिक बुडालंच नाही, .... मधुबालेला डॉक्टरांनी यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करून वाचवलं .. असं काहीही. ही जगं एकमेकांशी जोडली गेलेली आहेतही, आणि नाहीतही. आहेत यासाठी कारण त्यातल्या व्यक्ती जवळपास सारख्याच आहेत, नाहीत यासाठी कारण आपल्याला त्यांचं अस्तित्त्व सिद्ध करता येत नाही, आपल्याला एका जगातून दुसऱ्यात जाता येत नाही.

म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाला अशा एका जगातून दुसऱ्या जगात जाता येत नाही. पण एखाद्याला ते जमलं तर? असे फ़ॅण्टसीचे अनेक सिनेमे बघितलेले. 'बॅक टू द फ़्युचर' च्या तिन्ही भागांचं कितीतरीदा पारायण केलेलं. ते सारेच आवडलेले, पण अगदी त्यांवर लिहावं, असे ते भिडले नाहीत. ते सारे मनोरंजनाच्या इण्डेक्स वर ह्या बटरफ़्लाय पेक्षा कितीतरी वरचे होते, तरीही. बटरफ़्लायची सुरुवात तर इतकी असह्य हिंसक होते की कसाबसा पाउण तास हा पिक्चर पाहून बंद केलेला. पण नंतर जेव्हा लावला, तेव्हा पुढच्या उरलेल्या कथेने पकड घेतलेली.

आयुष्यात घडून गेलेल्या घटनांकडे वळून पहाता, कितीतरीदा एखादी गोष्ट, आपलीच कृती (किंवा न केलेली कृती) तशी झाली नसती तर किती बरं झालं असतं, असं वाटून जातं. पण ह्या कथानायकाच्या लक्षात येतं की, ही फ़क्त पश्चातबुद्धी न रहाता, ती चूक दुरुस्त करायची जरी संधी मिळाली, आणि त्याने कितीही कॉम्बिनेशन्स केले तरी सारंकाही आलबेल होवून जाणार नसतं. एका ठिकाणी शिवायला गेलं की दुसरीकडे कुठेतरी उसवतं. नथिंग इज परफ़ेक्ट. नन ऑफ़ दोज पॅरॅलल युनिव्हर्सेस आयदर.. पण ही झाली त्याची दु:खं, ज्याला असं एका जगातून दुसऱ्यात जाता येतं, आणि काहीतरी करण्याच्या, न करण्याच्या संधी मिळतात.

आपल्या बाकीच्यांचं काय? तर आपलं असं की - आत्ता या क्षणी आयुष्यात घडणारी, न घडणारी पण घडायला हवी अशी घटना, आपण केलेली कृती, किंवा करायला हवी असूनही न केलेली प्रत्येक कृती - हे सारं काही आपलं आणि आपल्या आजूबाजूच्यांचं भविष्य, कल्पनाही करवणार नाही इतक्या ताकदीने उलथापालथवून टाकत असतं, शिवाय हे सारं त्या घडतानाच्या क्षणी आपल्या इतकं आकलनाबाहेरचं असतं, आणि प्रोव्हायडेड की तिचं महत्त्व पुढे कधीतरी लक्षात जरी आलं तरी चुकचुकाटाशिवाय आपण काही करू शकणार नसतो, तर अशात - आयुष्याच्या प्रत्येक आणि कोणत्याही क्षणी वी जस्ट काण्ट ऍफ़ोर्ड टू बी कॅज्युअल ऍण्ड रिलॅक्स्ड!

Life is as dangerous as careless driving on a German Autobahn. You aught to be alert all the time for your and others' actions - even a flap of a butterfly's wing can set a tornado in almost half of the world!

Sunday, November 18, 2007

चुरगळलेले दिल आणि परराष्ट्र धोरण

0 प्रतिक्रिया
ह्या ब्लॉगला प्रोफ़ाइल नाही, लेखकूचे नाव नाही. हे सगळं किती बरं वाटतये! :-) यातून मिळतं स्वातंत्र्य, काहीही लिहायचं, वाचकूंना आज काय वाचायला/चावायला आवडेल याची तमा न बाळगता लिहायचं. हे असं स्वातंत्र्य नसतं तर आजच्या रात्र, चंद्र, आठवणी, प्रेम, विरह, व्याकूळ जीव, बोचरा वारा, सूर्यकिरण, तो, ती, तुटलेले फ़ुटलेले चुरगळलेले दिल वगैरे, आणि त्याच्या आणि तिच्या (पावसामुळे अनिर्णित राहिलेल्या क्रिकेटच्या सामन्यासारख्या) प्रेमाच्या अर्धवट जळून अर्ध्या सुलगत राहिलेल्या गोवऱ्या; या सगळ्यांनी मराठी ब्लॉगविश्व सुलगत धुमसत असताना; मी "भारताचे सद्य परराष्ट्र धोरण" या विषयावर निबंध लिहून स्वत:च्या नावानिशी छापून आणला असता, तर वाचकूंनी माझ्या संवेदनशीलतेविषयी घेतलेल्या शंकेने मी अर्धमेला झालो असतो!

ह्या आधीच्या वाक्यात लिहायला अजून बरंच काही एकाचवेळी सुचत होतं, पण ते लिहायच्या नादात सारा अर्थ ढासळेल, कुठे कशी विरामचिन्हे घालावीत यात गफ़लत होईल, आणि उगाच गद्याचं पद्य होईल म्हणून पुढील उपवाक्ये वेगळी लिहीत आहे.

१) त्या प्रेमाच्या अर्धवट जळालेल्या धुमसणाऱ्या गोवऱ्या - च्यायला एकदाच्या पूऱ्याच जाळून विषय का नाही हो मिटवून टाकत?
२) माझ्या संवेदनशीलतेविषयी शंका - त्या सुलगत्या ब्लॉग्ज ना वाचून मला जो वैताग येतो, आणि मुकेशभैय्या, तलत महमूद प्रभृती मला ज्या स्पीडने आवडेनासे झालेत ते पहाता, ही शंका मलाही यायला लागलीये.
३) ही शंका इतकी रास्त आहे की मला तलतचं नावही आठवेना, तर पटकन "शाम-ए-गम की कसम" ला गूगलून आलो.

पण ह्या अशा न्यूली फ़ाउण्ड स्वातंत्र्याचा श्वास घेत मी अगदीच कायच्या काय लिहीणार नाहीये. जे खरच मनापासून वाटलं तेच, आणि ते ही थोडक्यात. (कारण टाईम कमी आहे, एकाचवेळी बरेच ब्लॉग चालवायचेत नां!)

रेडिफ़, एक्स्प्रेस, टॉय, आणि गूगल-न्यूज वरून सापडलेल्या अनेक साईट्स वर ताज्या घटनांचे विश्लेषण करणारे कॉलम वाचताना (रेडिफ़ तर सरकार पडायला आलं की लगेच ज्योतिषांचे इन्टरव्ह्यू घेते!); एखाद्याचं आवेशात नसणं, मुद्द्याचं बोलणं, अक्कल न पाजळणं, अचाट प्रेडिक्शन्स न करणं, आणि मापात पॉझिटिव्ह / निगेटिव्ह बोलणं - सापडलं की आपल्याला फ़ार बरं वाटणारं ठरतं.

असच हे एक औकातमधे लिहीलेलं विश्लेषण सापडलं, आणि ते इथे शेअर करायला हे पोस्ट लिहीलं.

कॉंग्रेस समर्थक व्हावं की भाजप; हे मी अजून ठरवू शकलेलो नाहीये. समोर गप्पा मारणाऱ्या मित्राच्या उलट बाजूची रट लावून धरून त्याला पिडायचं एवढंच माझं धोरण असतं. (म्हणून सीताराम केसरी आणि मग सोनिया अध्यक्ष झालेल्या कॉंग्रेसला मी कुमार केतकरांपेक्षाही जास्त का सपोर्ट करायचो याचं माझ्या मित्रांना कोडं पडायचं). तेव्हा मी निवडून हाच लेख का इथे दिला, यावर चावून मला भाजप समर्थक वगैरे ठरवून नका. अर्थात, मला अशी सफ़ाई द्यायचीही काही तशी आवश्यकता नाहीये म्हणा, पण आपलं सवयीने सांगितलं गेलं, झालं.

Friday, November 16, 2007

कुमुद छुगानीच्या चुलतबहिणीचं गाणं

13 प्रतिक्रिया
पियानोवरची ७ गाणी, आणि एस्डीकडची लताची ५ गाणी वाचल्यावर आपणही असा संग्रह लिहावासा वाटलेलं.. पण ट्युलिप आणि नंदनला त्यांना अपील करेल अशी थीम सापडली - मला ती सापडेना. 'माईकसमोर म्हटलेली गाणी' अशी एक थीम घोळून गेली, पण त्यांत फ़ार कॅण्डिडेट्स यायला लागले - म्हणजे 'कुछ कुछ' मधलं 'कोई मिल गया' हे सुद्धा तसं माईकसमोरच म्हटलेलं. हे लक्षात आल्यावर भवानीप्रताप सारखं जोर्रात "ईईईशश.." म्हटलेलं!

मग रिस्ट्रिक्ट करायचं म्हणून 'माईकसमोर स्थिर उभं राहून चेहेऱ्यावरच्या एक्स्प्रेशन्सशिवाय एकही अंग न हलवता म्हटलेली गाणी' अशी थीम जवळजवळ फ़ायनल केली. पण त्यात अभिमान मधली एकदम ४ (पिया बिना, मीत ना मिला, लूटे कोई, तेरे मेरे मिलन की) गाणी, 'बरसातकी रात'चं टायटल सॉंग, रीना रॉयचं 'शीशा हो या दिल हो', कुणाचंतरी 'मैं बेनाम हो गया', कभी कभी मधलं 'मै पल दो पलका शायर', मुकासि मधलं 'ओ साथी रे', धर्मेंद्रचं 'मेरे दुष्मन तू मेरी', राजेंद्रकुमारचं 'मेरे मेहेबूब तुझे', आणि 'दोस्ताना'तलं 'बने चाहे दुष्मन' - आठवले. हे असलं कलेक्शन पाहून दुसऱ्या कुणाच्या आधी मीच मला जोडा हाणला असता! टी-सेरीजवाले सुद्धा ह्या गाण्यांना एका पंक्तीत बसवून कॅसेट विकणार नाहीत. ही गाणी वाईट आहेत असं मुळीच नाही, पण त्यांच्याबद्दल पॅशनेटली लिहावंसं वाटत नसेल तर काय मजा?

पण ह्या सगळ्या फ़सल्या खेळातून ड्राफ़्ट केलेलं पोस्ट डिलीट करवलं नाही, आणि ह्या पोस्टने आज नेट पाहिलं, ते फ़क्त एका गाण्यामुळे! ते गाणं आठवलं, आठवत राहीलं, पूर्वीही ग्रो झालेलंच, आताही पुन्हा सरपटत वर चढलेलं, आणि त्याबद्दल लिहून पोस्ट केल्याशिवय चैन पडणार नाही असं वाटेस्तोवर डोक्यात प्ले होत राहिलं.

मजरूह मला आवडायचा. अर्थात साहीर नंतर. पण दुसऱ्या नंबरनेही तो मला आवडणं हे त्याच्यासाठी तसं मानाचं स्थान होतं. त्यावर त्याने खूष रहायचं की नाही? पण ऊत असतो एकेकाला. ६९ च्या खामोशीत एका नवोदिताने 'डोळ्यांतला सुगंध पाहिल्याची' उपमा लिहीली तर खडूसपणे मजरूह म्हणालेला की "आजकालच्या नवकवींना कशा उपमा लिहाव्या तेही कळत नाही. " झालं. मजरूह एका दिवसात माझा नावडता झाला. (म्हणजे 'असं झालं होतं' असं मी जेव्हा वाचलं तेव्हापासून. ऍक्च्युअली ते गाणं लिहीलं जाणं, आणि ती टीका हे दोन्ही माझ्या जन्माच्या बरंच आधी होवूनही गेलेलं होतं.)

दीदीचा आवाज शार्प म्हणजे किती शार्प असावा, काही लिमिट? जेव्हा बाकी गायक गायिका 'र' चा उच्चार केला न केला असा 'ल' च्या जवळपासचा ऐकू येईल असा करत असताना दीदीने "मी 'र' म्हणत्येय 'ल' नाही" असं किती ठासून सांगावं? गाताना श्वास घ्यावा आणि सोडावा लागतोच - पण त्या श्वास सोडण्याच्या वेळेस बरोब्बर 'रेहेने दो' चे शब्द मॅच करून सुस्कारा टाकल्याचा इफ़ेक्टही अफ़लातून.

गाणं जिच्यावर चित्रित केलंय तिचं नाव कधीच माहीत नव्हतं. लहानपणी म.टा. मध्ये एक लेख वाचलेला "कुमुद छुगानी तुझं कुठं चुकलं?". त्या काळच्या हिंदी सिनेमांत साईड रोल करणाऱ्या एकीला उद्देशून लिहीलेलं खुलं पत्र! त्या पत्रात काय होतं ते एक अक्षरही आठवत नाही, पण ते शीर्षक इतकं कॅची होतं की अजून लक्षात राहिलेलं. - त्या कुमुदला जर कळलं की गेल्या २०-२२ वर्षांपासून कुणीतरी तिचं नाव लक्षात ठेवलंय तर तिच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहाणार नाही! ;) तर अशा ओळखू न येणाऱ्या साऱ्या साळकाया-माळकाया माझ्यासाठी कुमुद छुगानीच.

दीदी गात असताना मागे वाजणारा फ़क्त तबला. गायच्या दोन मधल्या ओळींत तबल्यासोबत २ प्रकारचे व्हायोलीन. एक हाय ट्रिबलचा शार्प, आणि दुसरा - तबल्याला सोबत - 'बास' असलेला. काय इफ़ेक्ट आलाये!

आणि या सगळ्यावर ताण म्हणजे गुलजारचे शब्द. त्या एकेक उपमा.. नक्की पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर लिहीलं असावं हे गाणं.. त्या ओळींच्या खुलाशात जाऊन चिरफ़ाड करून रसग्रहण करणंही निर्दयी ठरतं - त्या पेक्षा ते काव्यही आहे तसंच अनटच्ड राहू द्यायचं.

चित्रपट : खामोशी.
वर्ष : १९६९.
गीत : गुलजार.
पार्श्वसंगीत : हेमंतदा.
गायिका : लतादीदी.
चित्रित : कुमुद छुगानी ची चुलतबहीण (असावी!).

Thursday, November 15, 2007

ब्लडी थिन लाईन

11 प्रतिक्रिया
मज्जा असते नाही? क्रिकेटर नसलो तरी बॅडपॅच येत रहातो. इथे "येत रहातो" ही दोन क्रियापदे आहेत. म्हणजे तो बॅडपॅच येतो, आणि चांगला ठिय्या मारून रहातो सुद्धा! बॅडपॅच शब्दाची खासियतही अशी की क्रिकेटरला फ़ेवरेबल कंडिशन्स असूनही खेळता येत नाही. म्हणजे बॅडपॅच असला की सचिनला त्याच्या होमग्राउंड असलेल्या वानखेडेवर, बांग्लादेश किंवा केनिया सारख्या छुटपुट पिल्लांसमोरही २, ६, ० असे आउट व्हावे लागते. यामागे काही कारण नसतं, किंवा जे असतं ते कधी कळतच नाही. काहीही करायचा अनुत्साह भरून राहिलेला, बरं डोक्यात विचारांचं वादळ वगैरेही नाही, नुसतंच शांत सुन्न कन्फ़्युजन! म्हणजे नेमकं काय ते माहीत नाही. मराठी वर्तमानपत्रवाले याला "सूर गवसला नाही" असे म्हणतात. म्हणजे बॅडपॅच आला की "सूर गवसत नाही" असा बिल्ला लावून घ्यायचा.. जर एखाद्या गवयालाच बॅडपॅच आला तर त्याला "अक्षरश:" सूर गवसत नसेल..!

बरं अशी अवस्था चालू असताना जर एकीकडे ठरलेल्या वेळी शाळा, क्लासेस, सबमिशन्स, घटक/सहामही/वार्षिक दिवाळखोऱ्या अशा नियतीने नेमून दिलेल्या दुर्घटना घडत असतील तर त्या लोंढ्यात वाहून जाताना बॅडपॅच सुसह्य संपायचा. त्या गेलेल्या अठवड्या/महिन्यांकडे पाहिलं की "काय झालं होतं मला?" चं कुतुहल वाटायचं, पण सर्व दुर्घटना वेळेवर पार पाडलेल्या असल्याने ते दिवस/वेळ वाया घालवल्याची बोच नसायची. वर्षाच्या फ़ायनल हिशेबात तो घोळ लपला जायचा.

नियतीने दुर्घटनांचं टाइमटेबल आखून सारं करवून घेणं जेव्हा थांबवलं, आणि सांगितलं "जा, तू ग्रॅज्युएट झालास, आता तुला पाहिजे ते कर", तिथपासून बॅडपॅचेस ना तोंड देणं महामुष्किल झालेलं. "इयत्ता नववी चांगल्या मार्कांनी पास करणे" इतकं स्पष्ट वार्षिक टार्गेट असताना बॅडपॅच चे घोळ हिशेबात लपवता यायचे हो. जर सगळेच पॅरॅमिटर्स व्हॅरिएबल असतील तर इक्वेशन सोडवायला सुरुवात तरी करायची कुठून? उरलेल्या अनलिमिटेड आयुष्याची एकच यत्ता असेल, तर हिशेब रोजचा रोज मांडावा लागणार..

मोठ्या शाळेतल्या शेवटच्या सेमला ह्या अनुभवाने पहिल्यांदा झोडपलेलं. सब्जेक्ट नाही, क्रेडिट्स नाहीत, क्लासेस नाहीत, उजाडल्यापासून मावळेपर्यंतचा दिवस, आणि मधली रात्रही तुमचीच. पाहिजे तसे जगा, पाहिजे ते करा. काय करायचं ते विचारू नका, कसं करायचं ते विचारू नका. गुरुजी म्हणायचे "कम अप विथ युवर ओन आइडियाज".. च्यायची जय! डोक्याचा पार म्हणजे पार गोविंदा झालेला.. काहीतरी थातुरमातुर करून गुरुजींना दाखवलं तर उनकी पारखी नजर लगेच दूध का दूध आणि पानी का पानी ओळखणार.. आणि लोकमान्यांच्या वरच्या पट्टीतल्या आवाजात आणि स्पष्टवक्तेपणे "धिस ऑल इज नॉन्सेन्स, डू यू अण्डरस्टॅण्ड?" असं खडसावून विचारणार. त्यांना काही दिवस तोंड दाखवलं नाही तर दिसल्यावर काही न बोलता फ़क्त घुश्शात बघुन पुढे निघून जाणार. या साऱ्याचं बिल्ड होत जाणारं निगेटिव्ह प्रेशर. निगेटिव्ह अशासाठी की ह्या प्रेशर मुळे काही चांगलं काम होण्या ऐवजी असली नसलेली हवा जाणार!

विषयांतर झालं.. तर तिथून जो हा डरावना अनुभव घेतलेला, तो आजतागायत चालू.. तिथे गुरुजी कधी रागावले की सांगायचे तरी "सी, नेव्हर गेट रिलॅक्स्ड, ऍटलीस्ट नेव्हर गेट मेण्टली रिलॅक्स्ड!".. त्या धाकाने नाही बाउंडरीज तर निदान सिंगल, टुडी रन्स निघत रहायच्या.

करेक्ट! तोच फ़रक पडलाये तेव्हा आणि आत्तात. आतून मोटिव्हेशन नसलं किंवा कमी पडलं तर गुर्जींचा धाक असायचा, गाडी रुळावर ठेवायला. आताशा टंगळमंगळ केली तरी १ तारखेला पगार मिळतो म्हटल्यावर तसंच होवू लागलेलं - पण कातडी पुरेशी निगरगट्ट नसल्याने म्हणा किंवा धावत रहायच्या सवयीने म्हणा - दिवस फ़ुंकून टाकले गेल्यावर गिल्टी कॉम्प्लेक्स टोचून छळतो! पण बॅडपॅच म्हणजे फ़क्त टंगळमंगळीत घालवलेले दिवस नाही.. तसं असतं तर सोप्पं होतं की.. टंगळमंगळीनंतर टोचणाऱ्या गिल्टी कॉम्प्लेक्सला घालवायला म्हणून घाबरत्या आवेशाने काही करायला जुंपावं, तर हुलकावणी देणारी छोटी छोटी यशं - हा खरा प्रॉब्लेम.

हॅरी म्हणायचा - "कितनी भी कोशिश करो, कोई गॅरंटी नही के सर्किट वर्क कर जायेगा. फ़िर सब आके तुम्हे गाली देंगे. सुननेका. सब सुन लेनेका. फ़िर कभी ऐसाभी होता है के पेहेलेसे कम मेहेनत की हो, तो भी सब बढियासे हो जाता है, और जनता तारीफ़ोंपे तारीफ़ करती रेहेती है. सी - देअर इज सच अ ब्लडी थिन लाईन बिटवीन सक्सेस ऍण्ड फ़ेल्युअर! तुम्हारे हाथ मे कुछ नही होता!"

***

आत्ता सध्या संपलेल्या बॅडपॅचमधून शिकलेले धडे असे =
१. केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.
२. चांगले सिनेमे, गाणी, वाचन, गप्पा यांतून एनर्जी मिळते.
३. सदैव करायला काहीतरी उद्योग हवा, चॅलेंज हवे.

आणि अजून काय काय...

आता हे काय तुम्हाला माहीत नाही असं नाही.. किंवा मला आधीपासूनच माहित नव्हते असे नाही.. किंवा मला नेमक्या बॅडपॅच मध्येच हे आठवले नाही असेही नाही.. तरी.. चालायचंच..

असं म्हणतात, की ह्या बॅडपॅच वर योगविद्येत हमखास उपाय सांगितलाये - तीनदा खोल श्वास घेऊन हळूहळू सोडणे! वेस्टर्नांत फ़क्त "इट्स जस्ट अनादर बॅड हेअर डे" असं म्हणून हसण्यावारी नेतात. मला मात्र या दोन्हीपैकी एकानेही इतक्या सोप्या रितीने गुण येण्यासाठी आधी एक दोन डझन वर्षे तपश्चर्या करावी लागेल!

जाने दो! तर असा तो असाध्य बॅडपॅच नुकताच संपलाये, आणि कालपासून नव्या वीरश्रीने दुकानात काम करू शकलोये. (तो चालू असताना त्याबद्दल भकास काहीतरी लिहून तुम्हाला पिडण्यापेक्षा तो गेल्यावर आनंदाने त्याच्याबद्दल लिहावं असं ठरवलं होतं.)

Wednesday, November 7, 2007

आशा आणि भय

4 प्रतिक्रिया
शॉवशांक रिडम्प्शन हा कसा भारी सिनेमा आहे हे एका मित्राने सांगितल्यावर जास्त उत्साह दाखवला नव्हता, कारण अशा कितीतरी बाबतीत त्याने दिलेल्या कॉमेण्ट्स जरा जास्तच कायच्या काय असतात आणि त्यात जास्त हवा नसते हे स्वत: अनुभव घेतल्यावर कळायचं. पण यावेळेस तसं झालं नाही.

त्याच्याप्रमाणे ह्या सिनेमाचा फ़ॅन होवून अगदी संग्रही असायला डी.व्ही.डी. विकत घेण्याच्या टोकाची प्रतिक्रिया माझी बिलकूलच नाही. - मी तर पुन्हा हा सिनेमा पहाण्याचेही कटाक्षाने टाळेन - पण मी आतापर्यंत पाहिलेल्या, खतरनाक इम्पॅक्ट करणाऱ्या सिनेमांपैकी हा एक आहे, अशी आठवण मात्र कायम राहील. इम्पॅक्ट - शोलेच्या लेव्हलचा, किंवा टायटॅनिकच्या, किंवा आनंद च्या लेव्हलचा. अजून नावं आठवत नाहीत. शोले आणि आनंद ला असलेल्या विनोदाच्या झालरीने, आणि टायटॅनिकच्या टॅप-डान्सने मनोरंजन तरी केलेलं असतं. शॉवशांक तेवढाही डिग्रेस होत नाही.

ह्या कथेला तात्पर्यकथा मानून वाचकाने त्यातून आशावादी बनण्याचा बोध घ्यावा अशी लेखक स्टीफन किंगची उदात्त भूमिका असेलही, पण फ़्रॅंक डरबॉंटने ती कथा इतकी ताकदीने प्रेझेंट केलीये की, ते तात्पर्य आणि तो बोध - दिनेश मोंगियाला "बघ तो सचिन कसा न घाबरता छान खेळतो" असं सांगितल्यासारखा - आपल्या आवाक्याबाहेर २ हात वरून जातो.

मागे उरतं ते तुरुंगाच्या आयुष्य हळूहळू कोरून कोरून आतच संपवणाऱ्या भिंतींचं भय. १९ वर्षे चाललेल्या शिक्षेच्या पहिल्याच दिवशी इतकी दूरदृष्टी असलेल्या, निराशेने भीतीने एकदाही न खचणाऱ्या नायका ऐवजी, चुकून जर त्याच्या एखाद्या सोबत्याच्या जागी स्वत:चा चेहरा दिसला तर शॉवशांक चा इम्पॅक्ट आपलं अंग गार पाडतो!

Tuesday, November 6, 2007

कणिक क्रॅश रक्तपात आणि पंकज उधास!

4 प्रतिक्रिया
आजकाल हे असं फ़ार होतं. डोक्यात बरंच काही येत असतं पण लिहायला काही उतरत नाही. बायकांनी कणिक भिजवायला घेतली की कणिक, पाणी, तेल, आणि मळणं योग्य प्रमाणात जमवून ३ मिनिटांत कणकेचा मऊ आणि एकसंध गोळा बनवावा; तशा सफ़ाईने ट्युलिप त्यांच्या ब्लॉगवर विषयाला धरून, नेमकं आणि धारदार लिहीत जातात. आपण फ़क्त मेस्मराईझ होवून वाचायचं. आणि आपण लिवायला बसलं की आपला ब्लॉग मात्र पुरुषाने कणिक मळल्यासारखा दिसत रहातो.. परातीत एकिकडे चिकचिकित कणकेचं पाण्यासोबत डबकं झालेलं, दुसऱ्या बाजूला अर्धवट भिजलेला कोरडा पिठाळ गोळा, या दोघांना एकत्र करण्याच्या नादात लडबडलेली दहाही बोटे आणि तळहातही.. सगळा ओटा माखलेला, आणि अजून कितीही पीठ, पाणी, मळणं किंवा वेळ घातला तरी काही एकसंध जमेलच याचा कॉन्फ़िडन्स नाही. मळता मळता हात लख्ख गोरे झालेले, आणि कणीक काळवंडत चाललेली.. मग हे असंच अर्धवट लडबडलेलं ओलं कोरडं तसंच परातीत थापून ब्लॉगवर पोस्ट करायचं. लोकं काय आजकाल कशाचंही कौतुक करतात!


(१)क्रॅश बघितला. पिक्चरने खिळवून ठेवलं. पण त्यावर काही लिहावं की नाही हेही ठरेना. त्याची कथा, आणि कन्सेप्ट मस्त असली तरी घटना मुद्दामहून जुळवून आणलेल्या वाटणाऱ्या, नॅचरल वाटण्या ऐवजी.. मग ते तसंच राहून गेलेलं.
(२)सी.एन.एन. नं एक ब्रेकिंग न्यूज दाखवलेली - एका पोलिसानं बेशुद्ध पडलेल्या मांजरीला माउथ-टू-माउथ देवून वाचवलेलं. मग त्याला ब्रेव्हरी ऍवॉर्ड कसा दिला जावा यावर जाणकारांची चर्चा - च्यायला तिडीक गेलेली. म्हणजे मी काही डाय-हार्ड व्हेगन नाही. तसा मी व्हायला पाहिजे की नको, का व्हायला पाहिजे, आणि का नको याचं बॅकग्राउंडला चाललें कन्फ़्युजन ते वेगळंच आहे.. पण मांजरीला माउथ-टू-माउथ देवून वाचवणारा पोलिस रात्री यंग काउ चं बीफ़ खात असेल, आणि सल्लूला चिंकारा मारल्याबद्दल सजा देणारा जज्ज लंचला मटण हंडी मागवत असेल.(मला सल्लूबद्दल तिळमात्रही प्रेम नाहीये.) मागे एकदा प्राण्यांना कत्तलखान्यात कसं प्रोसेस केलं जातं ते दाखवणाऱ्या डॉक्युमेण्टरीत पाहिलेला उघडावाघडा हिंसाचार आठवणींतून निपटून काढावा वाटतो.
(३)जर्मनीत झालेल्या कानिबॅलिझम केस ची जुनी बातमी.. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी आनंदाने मरायला तयार झालेला दुसरा मित्र.. काय चाललं असेल मनांत? महाजनांची बातमी देताना लोकप्रभेत टोकेकरांनी दिलेलं शीर्षक - "मन सैतानाचा हात" कसं एकदम ऍप्रोप्रिएट होतं... हिंसाचार तुफ़ान नुसता रक्तपात..
(४)यातून ओढून खेचून मुसक्या बांधून मनाला दुसरीकडे रमवायला नेलेलं - "बघ कशी दिवाळी आलीये, हास बघू" - तर मेल्याला तिथेही पंकज उधास आठवलेला. "तूने पैसा..", "इस पैसेने..", "देस पराया.." आणि "पंछी पिंजरा.." ह्या ४ ओळींना आवाज चढवत नेल्यावर हताशपणे म्हटलेली ५ वी ओळ "आजा उम्र बहोत है छोटी" जास्त इम्पॅक्ट करते का? ती ही चढवली असती तर किक गेली असती का? याचं ऍनॅलिसीस!


च्यायची जय! हे असं चालू रहातं. आणि बाकी ब्लॉगर्स म्हणतात की हे ब्लॉगर्स लिहीत का नाहीत? मग हे असंच अर्धवट लडबडलेलं ओलं कोरडं तसंच परातीत थापून ब्लॉगवर पोस्ट करायचं. लोकं काय आजकाल कशाचंही कौतुक करतात!

Friday, November 2, 2007

एक

0 प्रतिक्रिया
आज सकाळी दुकान उघडल्यापासून काही काम केलं नाही म्हणून तो तणतणतच बाहेर पडतो. दुपारचं जेवण झाल्यावरही खुर्चीत जाउन बसायची इच्छा होईना म्हणून पुन्हा तणतणत लॉंग वॉकला जातो - एकटाच. फ़ॉरेस्ट गम्प मधल्या वेड्या फ़ॉरेस्टला जसं उगाचच धावून बरं वाटतं, तसं वाटायला लागतं असं चालून. त्याच्यासारखं पळायचं नाही, पण चालायचं. टाचा जमिनीला नीट टेकल्या पाहिजेत, आणि स्पीड मॅक्झिमम हवा. मोठ्या शाळेत असताना हॉस्टेलातल्या मेसमधून बी.एफ़. घेवून ८:२८ ला निघून गुरुजींचा ८:३० चा तास ’पकडायची’ झालेली सवय उपयोगी येते. लंचने तरारलेल्या पोटावरचा बेल्ट अशा चालण्याने सुसह्य होत जाताना विचारही घरातला पसारा आवरल्यासारखे काबूत येतात. "इतने लोग तो हैं फ़िर तनहा क्यूं हो" च्या प्रश्नाला उत्तर द्यायची ताकद एकवटते. कुलूपासाखळदंडांनी प्रश्न आणखी बिकट केलेला असतो हे कळतं. एलकुंचवारांच्या एकटेपणाच्या दास्तानीत आपल्या विचारांच्या गुंत्यांची टोकं सापडणार नसतात. ब्लॉगवर किंवा मित्रांना इमेलमध्ये काही लिहीण्याची उबळ रोखण्यावर ’इतरांचे ब्लॉग वाचणे’ हा उपाय २/४ दिवसांपेक्षा जास्त दिवस पुरत नाही हे उमगतं. ब्लॉगविश्वात ढीग पडलाये - कविता, प्रवासवर्णने, ललित, कथा, भयकथा, पाककृती - या इतक्या साऱ्या पसाऱ्यात आपण लिहीलेलं कुठे जाईल पत्ता नसेल, मग कशाला लिहा? हा सूज्ञ विचार, "आपल्याला आपला ब्लॉग इझिली सापडलेला पाहिजेय की हरवलेला?" ह्या कन्फ़्युजनबद्दल बोलत नाही. त्याहीपेक्षा खूप मोठा आवाका असलेल्या "हे सगळं कशासाठी?" ह्या विश्वातल्या आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टी / घटनेच्या उपयुक्ततेविषयी शंका घेणाऱ्या प्रश्नालाही हा लॉंग वॉक पिटाळून लावतो. त्याच सुसाट वेगाने डेस्कपर्यंत चालत येवून पोहोचेपर्यंत सर्व कन्फ़्युजन्सवर उत्तरं मिळालेली असतात. काय करायचं ते नावांनिशी ठरलेलं असतं. ब्लॉग लिहायच्या उर्मीला इतरांचे मृत ब्लॉग दाखवून गप्प करण्यापेक्षा एकदाचं लिहून मोकळं होवून विषय हातावेगळा करणं अल्टिमेटली कमी वेळखाउ ठरेल याची खात्री पटलेली असते. भाद्रपद अमावस्येला नव्या ब्लॉगला सुरुवात करण्याचा प्रकार पुन्हा एकदा उरकल्यावर प्रोऍक्टिव्हली मॅनेजरकडून काम कसं मागून घ्यायचं ह्याचीही वाक्यं तयार झालेली असतात.

Monday, September 24, 2007

महल

5 प्रतिक्रिया
पुन्हा उघडलेली कुलुपे. पुन्हा उतरवलेल्या साखळ्या. अनिच्छेने, पण कसल्याश्या तीव्र इच्छेनेही. म्हणून कुलुपं काढल्यावरही कोळीष्टकं झाडायचा उत्साह नाही. कारण वास्तूची अवस्था महल मधल्या हवेली सारखी. फ़क्त वास्तूचीच बरं का, मालकाची किंवा मालकाच्या निजी जिंदगीची नाही. (तिथे आबादीआबाद आहे, टचवूड!) पण ह्या महालाचंच काय करावं कळत नाही. कुणाच्या आग्रहाला बळी पडून बांधायला घेतलेला, मग कधी वापरात कधी जोषात आरास वगैरे केलेली.. मग बऱ्याचदा उपेक्षित, आणि मग कुलूपांत बंद.

चालू ठेवतानाच्या उत्साहावरही कायम सावट की - आपण हे काय करतोये? आपल्या मनाच्या दरवाज्यांआड चाललेला कोलाहल आणि जल्लोश असा कुणालाही उपलब्ध करून द्यायचा? आणि कुणाला काही कळलं तर? आपली रास तर सावधपणे वावरणारी. पहा, पहा, पुन्हा आली ती उर्मी हे पोस्ट लगेच लिहीलंय तितकंच थांबवून डिलीट करून पुन्हा कुलूप लावून टाकायची..

मग मधे दुसऱ्या नावाने लिहायचाही प्रयत्न करुन पाहिलेला. पण ते पूर्णपणे सर्वांपासून गुपित ठेवणं पटेना, आणि उगाच स्वत:लाच वेड्यात काढल्यासारखं वाटायला लागलेलं.. अजून तिथे कुलूप नाही लावलं - पण लवकरच तिथेही एक ओसाड महल....

Thursday, July 19, 2007

अच्छा..

7 प्रतिक्रिया
मागचं पोस्ट जरासं अस्थिर मनस्थितीत लिहून पब्लिश केल्यावर, नंतर पुन्हा ड्राफ़्ट करून टाकलं! काय लिहायचं होतं, आणि काय लिहीलं याचा मेळ बसेना, म्हणून अजूनही लिहीण्याच्या मन:स्थितीचा अंदाज येत नाहीये, तर थांबलो होतो. पण मग पुढचा महिनाभर लिहायची उबळ आली तरी इण्टरनेट आणि वेळ नसल्याने लिहीता येणार नाहीये, तर म्हटलं दोन ओळी लिहाव्यात.

"ना तो कारवाँ की तलाश है" म्हणत विलंबित ख्यालात सुरू झालेली कव्वाली शेवटी जशी "जेहेरभी तो केहेते हैं की पीना होगा" च्या वेळेस सुपरफ़ास्ट द्रुत होते, तसं आयुष्य आता ट्रॅक बदलतंय। इथून पुढे ब्लॉगिंग / ऑर्कुटिंग करायला "फ़ुरसत के रात दिन" कधी मिळतील काय माहीत? महिन्याभरात इतके बदल होतील हे तरी कुठे माहीत होतं? मग पुढचे अंदाज आत्ताच बांधून निरोप तरी कशाला घ्यायचा, आणि नक्की भेटूचं प्रॉमिस तरी कसं करायचं?

पण एक मात्र आहे की अशा सुपरफ़ास्ट धावणाऱ्या फ़ेज ची पण एक निराळीच लज्जत असते! मग बॅगेत टूथब्रश कोंबताना, रहातं घर सोडायची खंत, किंवा नव्या सफ़रीवर जायची भिती वाटेनाशी होवून, सिंदबादचं आयुष्य नव्या एक्साईटमेंट ने भरून जातं!

अर्थात सफ़रीवर जाऊन कुणी तिकडेच रहात नसतं. सफ़र संपते, आपण परत येतो. तर जमल्यास तेव्हा भेटूया!

Thursday, June 14, 2007

औतखांख सॉर्ति उस्किटा औसखांख सैदा सालिदा एक्झिट

11 प्रतिक्रिया
युरोपाच्या निसर्गप्रेमळ भुलाव्यातून सुटका करून घेऊन बाकीच्या रखरखीत दुनियेत जाणं फ़ार अवघड असतं. पण मग मधेच "ती बाहेरचीच खरी दुनिया आहे, आणि आपण स्वत:ला 'द ट्रूमन शो' मधल्या जिम कॅरी सारखं सुखा-सुरक्षिततेत बंदिस्त करून घेतलंय", असं वाटायला लागतं. "युरोप हा घटकेभराच्या सहली पुरताच छान, हवाहवासा असावा जास्त नको" असं एक मन दुसऱ्या मनाला समजावून, पटवून द्यायला लागतं! माथेरान ला हवा छान वाटली म्हणून डोंबिवलीकर कधी तिथे स्थायिक होवून, तिथून छत्रपती ला अप-डाऊन नाही करायला लागत! तसंच काहीसं.

"च्यायची जय! लय झालं! अब पानी यहॉंतक आ गया है।" अशा अभिनिवेशापासून तर "हे इतकंही काही वाईट नाहीये नां? पुढे काय? गेलंच पाहिजे का? आत्ताच कशासाठी?" अशा पळपुट्या विचारांशीही सामना करत करत आम्ही शेवटी निर्णय घेते झालो.. टू टेक ऍन एक्झिट!

फ़्रॉम युरोप!

आमची ही अग्गदी म्हणाली होती, "आपण दरवर्षी ई.एन.डे. शी झगडत राहू, दरवर्षी एकेका वर्षाच्या व्हॅलिडिटीचं रेसिडन्स-कार्ड मिळत राहील, आणि नेमकी ई.एन.डे. जेव्हां आपल्याला ५ वर्षांचं परमनण्ट रेसिडन्स-कार्ड देईल, तेव्हा आपणच ते नाकारून इथून निघालेले असू." खरं वाटलं नव्हतं. असं काही वेड्यासारखं मी का करेन? पण तस्संच झालं, होतंय.

नक्की कसं वाटतंय, मनात काय काय चाललंय, हे आत्ता लगेच नाही सांगता यायचं. त्याबद्दल काही दिवसांनी.. आणि युरोपातून बाहेर पुढे कुठे जातोये, तेही कळवेनच..

सगळं आजच लिहून टाकलं तर ब्लॉग बंद करावा लागेल हा. ;-)

Tuesday, May 29, 2007

घायल

12 प्रतिक्रिया
फ़्लॅशबॅकमधून फ़्लॅशबॅकचे खेळ खेळत गोष्ट रंगवायला मी काही गुलजार नाही. तेव्हा 'रिव्हर्स मे स्टोरी सुनवण्याच्या' ऐवजी (सर्किटला सुद्धा आवडत नाही तशी सांगितलेली - संदर्भासाठी पहा : 'लगे रहो मुन्नाभाई' मधल्या 'ए भाय, हुवा क्या?' या गाण्याआधीचा सीन.) तर तसं न करता मी 'स्टार्टिंगसे सुनावतो'.

बरं आधीच सांगतो, ही गोष्ट काल्पनिक नाही. एका जित्या-जागत्या कॅरॅक्टरची आहे. ही कोणत्याही सिनेमावर आधारित नाही, ही त्या व्यक्तीची सत्यकथा आहे! ह्या कथेच्या नायकाचा सनी देओलच्या घायल चित्रपटाशी काहीएक संबंध नाही - वेल, थोडासा आहे, थांबा, सांगतो..

आता इथवर वाचत आल्यावर तुम्ही म्हणायला लागला असाल, की इतकं फ़ुटेज खाण्यापेक्षा याने फ़्लॅशबॅकपासून जरी स्टोरी सांगितली असती, तरी कथा जरा पुढे गेली असती - तर म्हणणं तुमचं योग्य आहे. एकेकाचा पिण्ड असतो - गुलजार फ़ुटेज खात नाही. मी फ़्लॅशबॅकमधून स्टोरी सांगत नाही!

तर झालं (आणि होतंय सुद्धा) असं...

इथे युरोपात देसी मित्रमंडळ पहिल्या दिवसापासूनच असलं तरी माझ्या ऑफ़िसात, अगदी रोजच्या काम कराव्या लागण्याऱ्या टीम मध्ये देसी नव्हते. गेल्या वर्षीपर्यंत. मग आम्ही एकाचे २, आणि २ चे ३ झालो.(म्हणजे ऑफ़िसात अजून २ देसी माझे कलिग झाले, इतकाच त्याचा अर्थ घ्यावा.) ह्या तिघांनी कल्ला केला. (३ चे पुढे ५ झाले, पण ते नवे २ जरा दूरदूरच होते.) तर हे आम्ही तिघे जेव्हा सर्व डच जनतेसमक्ष आपल्या राष्ट्रभाषेत बोलत असू, तेव्हा डचिज ची खरी नावं घ्यावी लागू नयेत, म्हणून आम्ही डच कलिग्ज ना साजेशी नावे दिली. - डेनिस, चमेली, बसंती, वीरू, करेला, पेस्तन, छोटा चेतन, भवानीशंकर, शेरू, लल्लू, बाबा, आसारामबापू, छोटा भोला, बडा भोला, छे-जेब, पॉपकॉर्न, खरगोश, किलबिल, चार्ली वगैरे.. यांच्याशी आमचं काही वैर नव्हतं, यातले बरेचजण आमचे खूप जवळचे मित्र ही आहेत, पण त्यांची नावे आमच्या हिंदी संभाषणात ऐकून त्यांना कसंनुसं होवू नये म्हणून ही सोय! अर्रर्र, लिस्ट मध्ये एक महत्वाचं नाव राहिलंच - घायल.

घायल ही काय वल्ली 'चीज' आहे, हे कळायला आम्हाला जरा वेळच लागला. तो निवांत पाय ताणून खुर्चीत बसतो, काम आलेलं पाहून खांदे उडवतो. मीटींग मध्ये केअरलेसली बोलतोच, पण सर्वांना सांगतो की त्याला इतरांपेक्षा कमी पगारावर घेतलंय म्हणून तो कमी काम करतो! त्याला हायवे वर सर्व लिमिट तोडून स्पीडने कार चालवायला आवडते. ती कार ही त्याने सर्वात स्वस्तातली घेतलेली असते, तर मग रोज सोमवारी सकाळी आम्ही घायल च्या स्टोरी ऐकायचो. एकदा त्याची कार भर हायवे वर हाय-स्पीड लेन मध्ये चालू चालूच बंद पडली, लकीली मोमेण्टमने पुढे जात राहीली.. बॉनेटमधून काळ्या धुराचा लोळ उठला, इतका की काही दिसेनासं झालं.. मग याने कार साईडला घेतली, आणि सर्व्हीसने ती 'टो' करून नेली. एका सोमवारची ही कहाणी ऐकून आमची घायलशी खरी ओळख व्हायला लागली.

काही सोमवारनंतर एका सोमवारी घायल रक्तबंबाळ, डोळा सुजलेला, आणि नाक अक्षरश: मोडलेलं, असा ऑफ़िसात आला. सगळे गोळा झाले, कहाणी ऐकायला.. शुक्रवारी पहाटे काही तुर्किश पोरांच्या ग्रूपशी मारामाऱ्या झाल्या, ज्यात अर्थातच बिच्चाऱ्या घायलचा काही दोष नव्हता, आणि टाके पडले..

काही वीकनंतर घायल ३ दिवस आलाच नाही. मॅनेजरलाही न सांगता. बुधवारी दुपारी त्याच्या आईचा ऑफ़िसात फ़ोन! "घायल कुठे आहे?" म्हटलं "आम्हाला काय माहीत? इथेही नाहीये." आम्ही सग्गळे टरकलो! हा 'खपला' की काय? मागेच म्हणत होता "मारीजुआना घेऊन टल्ली होवून नदीत पोहायचा बेत आहे", वगैरे! २ दिवस सगळे टेन्शन मधे! शुक्रवारी पोलिस-स्टेशन मधून मॅनेजरला फोन आला, "घायल १ वीकपासून लॉकप मधे आहे, खरंच तुमचा एम्प्लॉयी आहे का?" आम्ही खुषीने त्याच्या आईला फोन करून 'गुड न्यूज' दिली! 'जरा' मारामाऱ्या केल्या - उ हू - कराव्या लागल्या होत्या बिचाऱ्याला. मग कितीतरी महिने आम्हाला ही कथा पुरली. काय कसे घडले, आणि पोलिस, वकील, आणि कोर्टाचे अपडेट्स.

इतकं साधर्म्यं पाहून आम्ही त्याचं बारसं केलं - घायल.

मधे एक कॉफ़ी-ब्रेक मधे त्याच्याकडूनच कळलं त्याची प्रेमकहाणी ही कशी तुफ़ान संपली ते. याची पहिलीच गर्लफ़्रेण्ड. ८ वर्ष रिलेशनशिप मधे होते. मोठ्ठा ग्रूप होता मित्रांचा. ती मधेच याच्या मित्राची गर्लफ़्रेण्ड बनली. याचा देवदास झाला. २ वर्ष होतील आता ते तुटून.

मध्यंतरात घायल ने वैतागून क्रिस्टीन विकली! त्याची कार. त्याने दुसरी कार घेतली, पुन्हा मोठ्ठी पण स्वस्तातली. ही छान चालायची १८० किमी/तास वर सुद्धा. फ़क्त तिचं कूलंट फ़्लुईड लीक व्हायचं. मग हा दर वीक ला १० लिटर कूलंट फ़्लूईड चा कॅन घेऊन ठेवायचा. (जनरली वर्षाला १ लिटर कूलंट लागतं कार ला.)

मध्यंतरी आमच्या ग्रूपच्या डाऊनसाईझिंग मध्ये त्याचं टेम्पररी असलेलं कॉण्ट्रॅक्ट एक्स्पायर झालं, त्यासोबत अजून काही जणांचं. घायल ने नोकरी शोधली नाही. आम्ही त्याच्यासाठी शोधाशोध केली, त्याचा रिझ्युमे बनवून दिला, त्याला इण्टरव्ह्यू ला पाठवलं. लगेच नोकरी मिळवूनही आला.

२ महिन्यापूर्वी पोरगीही पटवलीये, आणि ती प्रेमात फ़ार सिरियस झाल्याने हा जाम वैतागलाये. मग ती त्याची कशी बायको होईल वगैरे कल्पनाविस्तार करून, त्याला मुलाबाळांसकटच्या त्याच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवून आम्ही त्याला पिळतो. ;-) दोघे पिसा, डब्लिन, स्पेन, आणि पॅरिसला जाऊन आलेत. ती खूप रोमॅण्टिक मूड मधे असते, आणि हा खांदे उडवून बेफ़िकीर हलगर्जीपणे बोअर होवून तिच्यासोबत ट्रिपला जातो!

परवा एका कलिगच्या लग्नाच्या पार्टीत घायलला पुन्हा ऍस्टल वरून पिळत असताना मी म्हटलं, "मी जरी कायमचा भारतात गेलेलो असलो ना, तरी येईन तुमच्या दोघांच्या लग्नाला." घायल अचानक सिरीयस झाला आणि म्हणाला - 'इफ़ आय मॅरी एव्हर, आय विल ओन्ली मॅरी विथ माय एक्स."

असा हा घायल.

Friday, April 27, 2007

शहर की इस दौड में

13 प्रतिक्रिया
शहर की इस दौड में दौड के करना क्या है?
अगर यही जीना हैं दोस्तों, तो फिर मरना क्या हैं?

पहली बारिश में ट्रेन लेट होने की फ़िकर हैं, भूल गये भींगते हुए टहलना क्या हैं!
सीरियल के सारे किरदारो के हाल हैं मालुम, पर माँ का हाल पूछ्ने की फ़ुरसत कहाँ हैं!
अब रेत पर नंगे पैर टहलते क्यों नहीं, १०८ चैनल हैं पर दिल बहलते क्यों नहीं?
इंटरनेट पे सारी दुनिया से तो टच में हैं, लेकिन पडोस में कौन रहता हैं जानते तक नहीं!
मोबाईल, लैंडलाईन सब की भरमार हैं, लेकिन ज़िगरी दोस्त तक पहुंचे ऐसे तार कहाँ हैं!
कब डूबते हुए सूरज को देखा था याद हैं?
कब जाना था वो शाम का गुजरना क्या हैं!

तो दोस्तो इस शहर की दौड में दौड के करना क्या हैं?
अगर यही जीना हैं तो फिर मरना क्या हैं?

***
हे मी लिहीलेलं नाहीये हो. ’लगे रहो मुन्नाभाई’ मधून ढापलंय. हे सांगावं लागावं? :(

Saturday, March 24, 2007

सिंदबादला सुख का टोचतं?

13 प्रतिक्रिया
सिंदबाद जेव्हा लहान असतो, तेव्हा त्याला मोठं व्हावंसं वाटतं. मोठा झाल्यावर तो जेव्हा गरिबीत किंवा मध्यमवर्गात मोडला जात असतो, तेव्हा आजूबाजूच्या सधनांकडे बघून त्याच्या मनात महत्त्वाकांक्षा जागते.. मग धडपडीनं, हॉवर्ड रोअर्कच्या चिकाटीनं, खलाशाच्या नोकरीत खपून, बिननकाशाच्या समुद्रात सफ़र करून, कष्टांनी, तो उच्चभ्रूंत गणला जावा अशा पोझिशनपर्यंत, समाजात वरपर्यंत प्रगती करत जातो.. साहजिकच. इथपर्यंत सगळं साहजिकच.

पण पुढे त्याला हे सारं सुख गोड वाटेनासं होतं.. दूरवरचे अज्ञात सागर पुकारतात.. यावेळेस पैशासाठी नाही, श्रीमंतीसाठी नाही... पण स्वत:ला नव्या परिस्थितीत ढकलून, तिथून सुखरूप परत येण्याची लढाई जिंकण्यासाठी. त्या जुगारी नशेसाठी.

"बाबा रे, जर नव्या सफ़रीवरून पुन्हा याच गावात यायचं असेल, आणि आल्याचा आनंद साजरा करायचा असेल, आणि जिवंत राहिल्याचं समाधान मानायचं असेल, तर जातोसच कशाला झक मारायला नव्या सफ़रीवर? जिथे की समुद्राला किनारा तरी मिळेल की नाही तेही माहीत नाही, किनारा मिळाला तर ती जमीनच असेल, की झोपलेल्या अजस्त्र माशाची पाठ असेल, त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा आहेस तिथेच गप्प पड की रे!" असं त्याचं सूज्ञ मन त्याला समजावून पहात असेलही. पण सिंदबाद त्याचं ऐकत नाही.


त्या एका छोट्याशा श्रीमंत राज्यातल्या टुमदार गावात, आपल्या बहूमजली महालात गाद्यागिरद्यांवर लोळून मित्रपरिवारासोबत दिन व्यतीत करत, दरवर्षी जवळच्या तितक्याच श्रीमंत असलेल्या पंचवीसेक राज्यांच्या एकानंतर एक सोप्या सहली आयोजित करण्याऐवजी, सिंदबादला सगळं बिनसवून पुन्हा सफ़रीवर जायचेच वेध का लागतात? सिंदबादला सुख का टोचतं? कुणालाच हे कोडं उलगडत नाही. स्वत: सिंदबादलाही.

बोलीभाषेत यालाच "कीडे असणं" म्हणत असावेत!

Tuesday, February 27, 2007

फ़ाउंटनहेडचे चेहेरे

13 प्रतिक्रिया
एखादं पुस्तक वाचताना यापूर्वी कधी असं झाल्याचं मला आठवत नाही.

एखादं नॉन-टेक्निकल पुस्तक मी सुमारे ७ वर्षांच्या अंतराने वाचायला घेतलंय म्हणून असेल, किंवा माझ्या आयुष्यातलं पहिलंवहिलं नॉन-मराठी (म्हणजे विंग्रजी) गोष्टीचं पुस्तक आता वाचतोये म्हणून होत असेल.. पण फ़ाऊंटनहेड ने पहिल्या ३०-४० पानांनंतर ग्रिप घेतल्यापासून, ते पुढे वाचत जाताना मला त्यातल्या भूमिकांचा विचार करताना त्या स्वभावांना साजेसे चेहेरे दिसत रहातात.. आणि मग ते चेहेरे कितीही दूर हटवायचा प्रयत्न केला तरी जात नाहीत, पुस्तकात जे जे घडतंय, ते ते त्या चेहेऱ्यांसह व्हिज्युअलाईझ होत रहातं, मन:चक्षूंपुढे (मराठी ब्लॉग वाचून वाचून माझं मराठी कोणा भाषामार्तंडासारखं सुधारत चाललंय!;-) ..), दिसत रहातं.

हॉवर्ड रोअर्क च्या आधी मला पीटर किटींग 'दिसला'. सैफ़ अली खान सारखा. मी ओंकारा पहाण्याच्याही आधी हे सेटींग झालं. आणि तो आता जातच नाहीये. पीटरच्या मनात झरझर बदलणारे भाव सैफ़ खरच तितक्या ताकदीने कधी दाखवू शकेल की नाही शंकाच आहे, पण त्याला 'चिकन्याचुपड्या हॅंडसम पर्सनॅलिटीसोबतचं पोकळ व्यक्तीमत्त्व' मॅच होतं.. मधे एकदा ७० च्या दशकातला प्रेम चोपडा दिसला होता - पण त्याचे 'खल' विचार त्याच्या चेहेऱ्यावरून, गुलाबजामावरच्या पाकासारखे ओघळत असतात. तर तो फ़िट होईना.. कारण "आपण 'खलपुरुष' आहोत" हे मानण्याइतके पीटर चे फ़ण्डे प्रेम चोपडा इतके क्लिअर नाहीत!

हॉवर्ड च्या थंड, शांत, अनप्रोवोकेबल गुणांना वाचताना मला बिग-बी दिसला. दीवार मधला खुर्चीत बसून बिडी ओढणारा, डॉन मधला डॉन झालेला - पण तो दिसून लगेच विरून जातो, कारण बिग-बी चा ऍंग्री यंग मॅन खूपच प्रोव्होकेबल होता; पीटर अतिशय वेदना देणारे सणसणीत अपमान करत असताना बिग-बी ला हॉवर्ड सारखं शांत रहाता आलं नसतं.. मग मध्येच दिसला पीअर्स ब्रॉस्नन - पण छे, तो लगेच सुटाबुटात रिव्हॉल्वरसह दिसतो.. मध्येच सरकार मधला अभिषेक - पण त्याचा रिझॉल्व्ह कमी पडतो.. मग अपमानांना स्मितहास्याने सामोरा जाणारा (म्हणून) नितीश भारद्वाज - पण तो जेव्हा दिसतो तेव्हा मुकूट आणि सोनेरी कपड्यांतच, म्हणून विचार झटकले.. तर पुन्हा बिग-बी.! हे असं चाललंय! :)

पीटरची गर्लफ़्रेण्ड कॅथरीन च्या जागी मला दिसली मेल गिब्सन च्या 'व्हॉट विमेन वॉण्ट' मधली फ़ाईल्स उचलणारी त्याच्या ऑफ़िसातली एक बिच्चारी मुकीशी क्लर्क. ती त्या रोलमध्ये फ़िट बसली.

डॉमिनिक दिसायची सुरुवात ज्युलिया रॉबर्टस ने झाली.. मध्येच ती दिसेनाशी होते, पण पुन्हा दिसू लागते.. ज्युलिया ला कुणी कॉम्पिटिशन द्यायला नाही आली..

फ़ाउंटनहेडच्या वाचनात आतापर्यंत भेटलेल्या सर्व पात्रांना असे मॅच सापडले नाहीत. कारण मी ते मुद्दामहून शोधत नाहीये. जे सापडलेत तेच डोक्यातून घालवायचा प्रयत्न करत रहातोये, तेव्हा नवे न सापडलेलेच बरे! या चेहेऱ्यांमुळे वाचनाचा निर्भेळ आनंद मिळवू शकत नाहीये असं वाटत रहातंय. पण ही प्रोसेस काही थांबवता येण्याजोगी नाही. आता या सापडलेल्या (आणि पुढे सापडू शकणाऱ्या) चेहेऱ्यांपासून सुटका नाही.!

Wednesday, February 7, 2007

टूटा सितारा तो...

11 प्रतिक्रिया
आज हॅम्बर्गहून कलिगसोबत परत येताना रात्री साडेआठच्या सुमारास कार च्या समोरच्या काचेतून रस्ता पहात होतो तर काहीतरी वेगळं दिसलं.. आकाशात, चमचमतं.. त्या आधीच काही मिनिटे आम्ही टेक-ऑफ़ घेताना दिसलेल्या विमानाबद्दल, आणि डावीकडे उंच मॉडर्न व्हाईट कलरच्या पवनचक्क्यांवर लावलेल्या लाल दिव्यांबद्दल बोललेलो.. तर हे नविनच आणि समोर अचानक पाहून कलीग ड्रायव्हिंग करता करता म्हणाला, "हेय, नौ वॉट ईज दॅट?"..
मी टुणकन उडी मारून (बेल्ट लावलेला असल्याने जास्त टुणकन नाही मारता आली) लय एक्साईट होवून ओरडलो, "इज इट अ फ़ॉलिंग स्टार?, वॉव्व..!! आफ़्टर अ लॉंग टाईम!"
यावर तो खवचटपणे आश्चर्याने जवळजवळ ओरडत म्हणाला, "डू यू कॉल ईट अ 'स्टार'??"..
मग मी जरासा सावरून, वैतागून, "या.. आय नो.. व्हॉटेव्हर.. अ मिनी कॉमेट लाईक सम ऑब्जेक्ट फ़्रॉम स्पेस.."
मराठीतल्या 'उल्का' ला विंग्रजी शब्द मला आठवेना.. "बट ईट वॉज व्हेरी क्लोज, ऍण्ड ब्राईट.. व्हेरी नाईस..!!" मला अजूनही माझा आनंद लपवता येईना!
यावर तो म्हणाला, "बट ओ.के., वी डोण्ट नीड टू वरी अबाऊट इट!"

च्यायला, वरी कोण करतंय? मला आनंद झाला होता तो तारा पाहून.. आणि या अरसिक प्राण्याने माझा हिरमोड केला.. आणि हो, ताराच..! आमचा शाहरूख सुद्धा म्हणतो, "टूटा सितारा तो, मॉंगा था रब से", म्हणून ताराच म्हणायचं!

त्याला गप्प करून, आणि विषय थांबवून मागे रेलून बसलो, तर 'कभी हॉं कभी ना' मधल्या त्या गाण्यातला तो तुकडा आठवला, रात्रीच्या अंधारात, तळ्याच्या किनारी लुकड्याशा सुचित्रा ला पाहून प्रेमाने येडा होऊन शाहरूख तारा तुटताना पहातो, आणि गातो,
टूटा सितारा तो मॉंगा था रब से तुझको ही जान-ए-वफ़ा,
जो टूट जाये तारें तमाम, मॉंगू वोही इक दुवा..!!

९३ साली ह्या सिनेमाची पारायणं केली तेव्हा ह्या ओळींनी आणि अशा कित्येक सिनेमांच्या कित्तेक सीन्स नी "आह्ह..!!सही!!" ची दाद हक्काने मागून घेतलेली.. आता १४ वर्षांनी त्यातला दर्द भिडणं कमी झालेलं.. पण सेलिब्रेट करायची बात अशी की तुटलेला तारा पाहून आजही कसं छान वाटलं! :-)

अर्थात तो माझा कलीग ३९ वर्षांचा झालाये, आणि मला अजून ९ वर्षांनी त्याच्या आत्ताच्या वयाचं झाल्यावरही हे सेलिब्रेशन असंच टिकवता आलं पाहिजे! तोवर ती 'किक' कमी होत होत मी ही त्याच्यासारखाच "डोण्ट वरी, ईट्स जस्ट समथिंग फ़ॉलिंग समव्हेअर, इटस नॉट गोईंग टू अफ़ेक्ट अस एनीहौ" असं नको म्हणायला लागायला! जाऊदे, तो गेला उडत.. पण मला कसं छान वाटतंय!

पण दरवेळेस तुटणारा तारा पहाताना त्या ताऱ्याचं ते लोभस दृष्यच सेकंदभर असं खिळवून ठेवतं ना, की काही मागायचा विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही! :) आणि त्यामुळेच या 'ईव्हेंट'ची लज्जत वाढते...

Tuesday, January 9, 2007

हैरान हूँ मैं।

16 प्रतिक्रिया
यंदा भारतात गेल्यावर उगाचच भांबावल्यासारखं करायचं नाही, आणि तिथेच रहात असल्यासारखं पहिल्या दिवसापासून वागायचं, असं आधीच ठरवून गेलेलो.. मुंबई विमानतळ जरा (फ़क्त जराच हं..) बरं दिसायला लागलंय. पूर्वी जे पिचकाऱ्या मारून रंगवलेल्या कळकट्टं थिएटरासारखं दिसायचं तसं नाहीये आता. विमानतळाबाहेर सगळीकडे धुराचा कुंद ढग साचून राहिलेला.. घ्यायला आलेल्या क्वालिस चा ड्रायव्हर अनोळखी होता, आणि ओळखिचा असता तरी मला कधी त्यांच्या झोप न येण्यावर विश्वास नसल्याने यंदाही प्रवासात जागाच राहिलेलो.. 'पलक झपी, दुर्घटना घटी'.. त्याची एकदा पलक झपकल्याबरोबर त्याला गाडी साईड ला घ्यायला लावली आणि चहा पाजला. त्यानेही कबूल केलं.

घरी स्वागत वगैरे.. ताज्या बातम्यांत नुकत्याच झालेल्या वॉर्डातल्या निवडणुका, ठरलेली लग्ने.. वॉर्डाच्या निवडणुकीला उभा राहीलेला कुणी 'शेख' म्हणुन अपक्ष उमेदवार रोज सकाळी येवून आईच्या पाया पडायचा, अगदी डोक टेकवून.. नेमकी तिची आंघोळ झालेली, आणि पूजा व्हायची राहिलेली अशा वेळेस.. त्याची गम्मत.. इन्क्युम्बेण्ट उमेदवार यावेळी पडला, याचे किस्से..

इथुन मी वर्षभर गूगल-न्यूज वर भारत, पाक, मनमोहन आणि मुशर्रफ़ नावाने सर्च देवून दर २ तासांनी भारत-पाक संबंधांच्या बातम्या वाचलेल्या.. पण तिकडे दीड महिन्यात टी.व्ही. वर, किंवा पेपरात, किंवा चर्चेत हा विषय आलाच नाही.. येतच नाही.. तिकडे चर्चेच्या बातम्या म्हणजे राज, राष्ट्रवादी वगैरेच.. महापालिका निवडणुकांचा दणदणाट.. आता मी पण २००७ मध्ये भारत-पाक चा छंद बंदच करेन.! च्यायला, मग माझं तरी काय अडलंय?

बाकीच्या दुनियेची फ़िकीर न करता, तिथले जवळपासचेच हजारो लोक एकमेकांना वस्तू विकून एकमेकांच्या जिवावर आपल्याच दुनियेत मस्त जगत रहातात. परदेशातल्या बातम्या म्हणजे फ़क्त चटपटीत 'संध्यानंद' स्टाईलच्या असल्या म्हणजे पुरे. :) माझ्याच गावातले मला अनोळखी वागवतात, आणि मी भिडस्तपणाने माझ्या परदेशी ठिकाण्याबद्दल न सांगता इथूनच बंगलोरहून आलोये असं सांगत रहातो.. मी तसं खोटं बोलल्याने त्यांना काही फ़रक पडत नाही..

एक मात्र आहे की इथे प्रत्येकाशी बोलताना जे एक सावधपणाचं चिलखत घालून वावरावं लागतं, ते तिथे अगदी अनोळखी जनतेसमोरही न घातलेलं चालतं.. मध्येच कुणी एखादा खडूस भेटतो, तेव्हा पुन्हा युद्धसज्ज व्हायचं. पण तेवढ्यापुरतंच.

बरेच रस्ते बरे झाले आहेत. त्यासाठी टोल द्यावा लागतो, पण परवडतं. नासिक-मुंबईही चौपदरी होतोये.. डायल-अप चं नेट मात्र फ़ार त्रास देतं. बेटं एक पान लोड होताहोता सारं तारूण्यं डोळ्यासमोर सरून जावं इतकी वाट पाहील्यासारखं वाटतं. दिवसाकाठी ६ तास भारनियमन असल्याने मनन आणि चिंतन करायला भरपूर वेळ मिळाला.. :) आयुष्याचं सिंहावलोकन ही करता येतं मग तेव्हां.. अर्थात रोज ६ तास सिंहावलोकन करावं, इतकं आयुष्य ही जगून नाही झालेलं.. तर पार्ट टाईम म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यांची सिंहावलोकनं करावीत की काय असा एक गुज्जु विचार ही येवून गेला. ते ज्योतिषी कसे दुसऱ्यांच्या पत्रिका पाहून देतात तसं.. ;)

परदेशात सलग काही महिने राहिलं की उगाचच असं वाटायला लागतं की आपण फ़ार मोठे तीर मारले आहेत, आणि आपले बांधव तिकडे खितपत पडले आहेत, आपणच तेव्हडे लक्की. पण तिकडे जावून पाहिलं की वाटतं ते जर दिवसाकाठी आपल्यापेक्षा जास्त क्षण हसत घालवत असतील तर फ़ायद्यात कोण आणि नुकसानीत कोण?

मुंबईला गाडीवर काही पुस्तकं घेतली. सांगण्यासारखी म्हणजे फ़ाऊंटनहेड आणि गॉडफ़ादर. लई ऐकलं होतं, आणि या फ़ंदात पडावं की नको असा बऱ्याचदा विचारही करून पाहिलेला, पण म्हटलं त्या पुस्तकांनी भेज्याला अपील करावं असं हेच वय आहे तर वाचून पहावीत. रिटायर्ड झाल्यावर कवळी डबीत ठेवता ठेवता गॉडफ़ादर वाचायला घेतलं (आणि ते ही पहिल्यांदाच), तर ती कवळी डब्यातून दात विचकून हसेल. गॉडफ़ादर च्या आधी हातात फ़ाऊंटनहेड घेतलंय, पण गेल्या १० दिवसांपासून परत ब्रेक झालाये. त्या पुस्तकाबद्दल नंतर स्वतंत्रपणे...

प्रवास फ़ार झाला. त्यात वणी ला सप्तशृंगीला जाणं झालं याचं बरं वाटलं. ९८ पासून जवळजवळ दरवर्षी एकदा गेलोये. तिनं त्या त्या वर्षीचे माझे सारे प्रश्न सोडवून दिलेले.. बरं वाटतं..

यावेळचा हा ब्लॉग खास चटपटीत होत नाहीये.. उगाच 'डायरी की दास्तान' लिहील्यासारखा. काही दिवसांनी डिलीट करून टाकावा असा.. देखेंगे!

या ट्रिपचं मेन ऍट्रॅक्शन होतं बहिणीचं लग्न. ते मात्र फ़ारच छान झालं. :) तिच्या सासरची माणसं फ़ार चांगली मिळाली आहेत, त्यामुळे काळज्या विरून गेल्यात! :)

यायच्या दिवशी जशीजशी मुंबई जवळ येत गेली, तशा गाडीत कमी होत जाणाऱ्या गप्पा, वाढणारी शांतता, साकीनाक्याआधी एल-ऍंड-टी पाशीच्या नव्या फ़्लायओव्हरला रस्ता चुकणं, विमानतळावर पाणावलेल्या पापण्या.. जड आवाज.

सकाळी टॅक्सीतून परक्या चकचकीत रस्त्यावरून परकी हिरवीगार शेतं पहाताना, "आपण तिकडचे असून परत इकडे का येतो? आलो तर परत तिकडे का जातो?" असले येड्यासारखे मासूम प्रश्न जिंदगी माझ्या समोर बसून मला विचारत राहिलेली...

Tuesday, November 21, 2006

ओ ढोल बजने लगा...

5 प्रतिक्रिया
भारतयात्रेची वेळ जवळ आली की दुकानात कामाचा लोड फ़ार वाढतो. हे लोक इतकं पिळायला लागतात की तुम्ही जणू परत येणारच नाहीत. पण ह्यावेळेस आधीच्या प्रोजेक्ट चा खून पडल्या पासून दुकानात शांतता आहे, आणि नवे प्रोजेक्ट सुरु होणार होणार अशा फ़क्त अफ़वांचं पीक आहे. तर सुट्टीच्या पूर्वसंध्येला (दिल्ली दूरदर्शनचा शब्द) ह्यावर्षी मानेवर जू नाहीये!

पण त्या ऐवजी घर-बदलण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला, आणि त्याची शेपूट कामं चालूच आहेत. तरी सारं (सध्यातरी) आटोक्यात दिसतयं. :)

काल पावसाची सर आली, तर दुकानाच्या खिडकीतून पहाताना, गावाकडचा पाऊस आठवला. जुन्या घराच्या गॅलरीत उभं राहून, गल्लीचा रस्ता दुथडी भरून गढूळ चॉकलेटी कलर च्या खळाळत्या पाण्याने वहाती नदी व्ह्यायचा. त्यासोबत गावभरचा कचरा (वेगवेगळ्या आकाराचा, रंगाचा, सायकलींचे टायरही) रस्ताभर पसरायचा. मजा यायची ते पहात उभं रहायलाही.. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाताना गल्लीत, चंद्रशेखर चौकात पावसाच्या अशा विखुरलेल्या खुणा चुकवत उड्या मारत चालावं लागायचं.. :)

यावेळची ट्रिप खास आहेही, आणि बरोब्बर एका वर्षानंतर. त्यामूळे बाबा म्हणतो तशा रिव्हर्स कल्चरल शॉक साठी ही स्वत:ला तयार करतोये! देशात गेल्यावर दुसऱ्या भूमिकेत गेल्यासारखं वाटतं. 'नया दिन नयी रात' मध्ये संजीवकुमार कसे ९ वेगवेगळे रोल करतो, तसा इथला मी आणि तिथला मी हे पूर्णपणे भिन्न असावेच लागतात, नाहीतर 'हैद्राबाद ब्ल्यूज(१)' मध्ये नागेश जसा देशात जावून भिरभिरल्या सारखा होतो तसं होईल, जे की फ़ार बोअरिंग फ़ीलींग असेल.

११ महिने एकाची आणि १ महिना अगदी दुसऱ्या व्यक्तीची भूमिका केल्यासारख हे आयुष्य ही गोड वाटतं मला. :) कधी शाळेतल्या दिवसांचे, मित्रांचे चेहेरे हे फोटो किंवा व्हिडिओ क्लिप सारखे आठवणींतून डोळ्यासमोर तरळुन गेले की ती दृष्यं आपल्या ह्याच आयुष्याचा भाग होती हे खरं वाटेनासं होतं..! आज वयाच्या २९/३० लाच मला ते फ़क्त १०/१२ वर्षापुर्वीचं आयुष्य अगदी गेल्या जन्मातल्या सारखं जुनं वाटतं.. 'कर्ज' मध्ये ऋशी कपूर ला घाटातला रस्ता आणि अंबाबाईचं मंदिर दिसावं तसं.

अमेझिंग!

भारतयात्रा जवळ आली की मला 'विरासत' मधलं हे गाणं हमखास आठवतं,

ओ ढोल बजने लगा..
गांव सजने लगा..
कोइ लौटके आया है..

त्यातल्या 'बहोत मीठा है पानी.. इस कुंवेका..' ही ओळ ऐकताना यात्रेची ओढ अजून मल्टिप्लाय होते..

Monday, October 30, 2006

स्वदेस : The Days Are Numbered.!

4 प्रतिक्रिया
अमेरिकेत म्हणे दर १० माणशी ६ जण इण्टरनेट ऍडिक्ट आहेत, आणि त्यातला १ तर क्रॉनिक ऍडिक्ट! असा अमेरिकेबाहेर सर्व्हे केला तर मी त्या ६ पैकीच्या उर्वरित ५ मध्ये असेन की त्या १ मध्येच? असा अपराधी विचार चमकून गेला.. त्यात गेल्या अठवड्यात ई-सकाळ वर मुकुंद टांकसाळेंची 'ऑरकुटा मुलगा आणि त्याचा बाप' ही विनोदी (पण टची) कथाही वाचलेली.. काहीतरी चुकतंय, बदलायला हवंय, असं काहीतरी डोक्यात चाललेलं.. बरं पुन्हा त्याबद्दलचे विचार लिहीण्यासाठीही सहारा ब्लॉगचा, म्हणजे इण्टरनेटचाच. (यालाच सोप्या विंग्रजीत 'आयर्नी', आणि अवघड मराठीत 'काव्यगत न्याय' किंवा 'दैवदुर्विलास' वगैरे म्हणत असावेत..)

पण त्या १ (मेव) च्या, आणि जमल्यास उर्वरित ५ च्या कॅटेगरीतून सुटका करून घेऊन, उरलेल्या 'नॉर्मल' ४ चौघासारखं आयुष्य जगायचं प्लॅनिंग कसं करायचं या विचारात 'छंदबदल' नावाच्या ब्लॉगचा प्लॉट मनात तयार करतच होतो, तर आमच्या पॉप्स नी माझा आज संध्याकाळी 'क्लीन बोल्ड' काढला..

अत्यंत गोडीत, आणि बिलकुल सेण्टी न मारता, हसत-हसत पॉप्स नी फोनवर बरोब्बर विषय काढला, आणि म्हणाले, "आता ५ वर्षे झाली. उगाच तिकडची ऍटॅचमेण्ट वाटायला लागायच्या आत इकडे नोकरी शोधून या परत. काय?"
माझ्या काहीतरी घुळघुळ करत म्हटलेल्या "हो ना.. तेच तर.. बघू.." ने दया येवून 'पेस' कमी करण्याच्या भानगडीत न पडता पॉप्स पुढे वदते झाले, "नाही लगेचच नाही काही घाई.. अजून माझी रिटायरमेण्ट आहे दीड वर्षावर.. पुढचं कम्प्लीट १ वर्ष २००७ चं, राहून घ्या बाहेर, मग २००८ ला या परत!"..
यावर अस्मादिक फ़क्त "हं..हं..हो..हं.." वरच आलेले.
पुढचा पेसर, "त्यासाठी तिकडे कंपनीला नोटीस वगैरे द्यावी लागत असेल तर देवून टाक मग.. आणि इकडे शोधायला ई-मेल करून दे.. तुला जिथे आवडेल तिथे! पुणे तर पुणे! बंगलोर तर बंगलोर!"
मी गप्प........ लंबी खामोशी....... मग कसंबसं बॅट काखेत मारून, ग्लोव्हज काढता काढता "हं, एक मिनिट, अश्विनी बोलतेय तुमच्याशी.." म्हणून पुढच्या बाउन्सर्स पासून पळ काढला..

कसले 'छंदबदल' अन कसलं काय? च्यायला क्लीन-बोल्ड निघाल्यावर उडून दूरवर गेलेल्या स्टंपकडे पहातच राहिलोय! मुन्नाभाई(१) च्या जहीरच्या स्टाईलमध्ये, "और पैसे सेव्हिंग करने थे..., वेस्ट युरोप के बाद नॉर्थ युरोप ऍण्ड इस्ट युरोप घूमके देखना था..., हो सके तो पार्ट-टाईम MBA करना था (ज्याला गेल्या ५ वर्षात मुहूर्त लागलाच नाही), ऑफ़िसमे गरजेपुरत्या 'पाट्या डालके' फ़ावले वेळमे(जो इथे भरपूर मिळतो) ब्लॉगिंग और ऑरकुटिंग करना था... हो जायेगा येह सब १ सालमें?" म्हणावंसं वाटतंय..

पण हे असले डायलॉग फ़क्त मनातल्या मनात.. अस्मादिकाचा तेंडुलकर झालाये.. आताशा क्रीझ वर गोड वाटायला लागून गेल्यावर, आमच्या द्रवीडने तिकडे पॅव्हिलियन मधूनच "डाव डिक्लेअर केलाये, या परत.." चा मेसेज देण्याच्या अर्थाने हात हलवून इशारा द्यायला सुरुवात केलीये.. आता द्रवीडच्या त्या इशाऱ्याकडे काणाडोळा करून तेंडल्या कितीवेळ बॅटिंगचा गोडगोड आनंद उपभोगेल, ओळखा बरं तुम्हीच! (कारण माझं मलाच नाही माहीत!)

Monday, October 16, 2006

नेमेचि येते मग ही वेळ...

9 प्रतिक्रिया
आधी आधी मी जराशा फ़ुशारकीने सांगायचो, पण मग हळुहळू आकडा जसा वाढत गेला, तसे ऐकणारे अधिकाधिक थक्क होवून माझ्याकडे पाहायला लागले. यात आधी सहकारी, मग मित्र, आणि मग घरातलेही.. मग नंतर तरीही मी स्थिरावेना, हे पाहून माझ्यात 'काही अर्थ नाही' असं मत त्यांनी बनवून घेतलं. तरीही मी थांबलो नाहीच, आणि दर नव्या वेळेस मग ते माझ्या 'डोक्यात फ़रक बिरक तर पडलेला नाही ना?' याचा अंदाज घेऊ लागले. पुढे तो प्रयत्न ही त्यांनी सोडला, आणि 'हाईट आहे', 'कमाल आहे', 'व्यसन लागलये' या प्रतिक्रियांनंतर मी 'या बाबतीतला आता ऑथोरिटी आहे' वगैरे sarcastic compliments ही दिल्या..

त्यामुळे मग आताशा मी त्यांना सांगणंच बंद केलंय. आणि म्हणून गुपचूप फ़क्त ब्लॉग वर लिहीतोये, की मी लवकरच हॉलंडमधल्या माझ्या १३ व्या घरात शिफ़्ट होणार आहे. मी इथे ११-०८-२००१ ला आल्यापासूनचं १३ वं, आणि लग्नानंतरचं ३ रं घर असेल. :-D

आधीच्या घरांचे पोस्टकोड आणि घरनंबर आठवणं तर शक्यच नाही, पण नुसत्या रस्त्यांची आठवून यादी करायला बसलो मघा, तर ११च भरायचे.. खूप ताण दिल्यावर आठवलं मधलं एक नाव. यातल्या बऱ्यांच घरांशी फ़क्त एकटेपणाच्याच आठवणी जुळलेल्या आहेत खरं.., पण राहीली लक्षात.., आणि काही ना काही कारणांनी बदललीही..

अगदी ऐनवेळी लोड येवू नये म्हणून वीकएण्डला जरासं पॅकिंग करताना पुन्हा कायकाय सापडलं, आणि पहात / वाचत बसलो! बाबा ने, ऍशने पाठवलेली ग्रीटींग्ज, बहिणींनी पाठवलेल्या राख्या, पत्रं, ट्रिपला जाऊन आलेल्या शहरांचे घड्यांवर जीर्ण झालेले नकाशे, आणि बऱ्याच वर्षांत न वाचलेली अभ्यासाची पुस्तकं! ;-)

आता पुन्हा नारायणाला जसं लग्न चढतं तसं मला नवं घर चढेल, आणि मसाला सिनेमाच्या क्लायमॅक्सला चढणाऱ्या पार्श्वसंगीतासारखं काम वाढत वाढत जाईल, आणि मग शेवटच्या "ढॅंग्ग...!!!" नंतर आम्ही नव्या घरात सेटलही होवून जावू..

पुढची वेळ येईपर्यंत. ;)

Thursday, September 28, 2006

जंगलात मी, संदीप; आणि बाहेर सिस्टीम-सी

5 प्रतिक्रिया
अठवड्याची सुरुवात एका टेक्निकल ट्रेनिंग कोर्स ने झालेली.. आतावर केलेले सारे असे 'कंपनी इण्टर्नल कोर्सेस' लय पकाऊ असतात ह्या अनुभवानंतर, आता करेन तर फ़क्त तो एकच भारी, बाकी बंद, अशी प्रतिज्ञा मी केली होती, ती पाळलीही! तर हा तोच तो सर्वात चांगला वगैरे असलेला कोर्स आता टपकला.. खरं तर त्याची वाट पहायला पाहिजे, आणि संधीचं सोनं वगैरे करून नीट शिकायला पाहिजे..(पण च्यायला, आता काय वय राहिलंय का शिकायचं?)..
कोर्स ला रजिस्टर केलं तेव्हा काय माहीत की ह्या गावात रहायला जाऊ, जिथून वन-वे २ तास अप-डाऊन करावं लागेल, जेव्हा कोर्स आईंडहोवन ला असेल तेव्हा! हम्म.. 'आलीया भोगासी' म्हणून चडफ़डत कोर्स साठी अप-डाऊन सुरु.. ट्रेन मध्ये बाया लय म्हणजे लय म्हणजे लय 'पक-पक-पक-पक' करत रहातात, ते कानावर पडून कान किटून जाऊ नयेत, म्हणून रोज आठवणीने सोबत MP3 प्लेयर नेलेला..
'अंतरातली ओली माया, तुटुदे म्हटले तरि तुटेना..'

धुकं असलं की म्हणे ट्रेन्स वेळेवर चालवता येत नाहीत! लोकं रस्त्यावर गाड्या चालवू शकतात, पण ट्रेन ला प्रॉब्लेम्स!
'गाडी गेली, फ़लाटावरि निश्वासांचा कचरा झाला..'

हम्म! ही कविता लय्य मस्त आहे.. पुन:पुन: ऐकावीशी वाटावी अशी. रिपिट लास्ट ट्रॅक, प्ले! :-)
'डोळ्यातुनि अडवुनि पाणी, हुंदका रोखुनि कंठी, तुम्ही केविलवाणे हसता, अन तुम्हास नियती हसते!'

मास्तर शिकवतोये. प्लेयर बंद आहे, पण शिकण्यात लक्ष लागत नाहीये, ऐकलेली कविता आठवतेय! च्यायला काय झक मारतोये मी इथे? काय चाललंय नक्की? किती बांधून ठेवायचं स्वत:ला शिक्षणात या?
'ती खिडकीतून बघणारी, अन स्वत:मधे रमलेली, गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते'
सलीलभाऊंनी ह्या ओळीला गाताना धक्का बसल्याचा भाव मस्त आणलाये. :-)

"One thing you all must keep in your minds, that although System-Verilog and System-C are serving the same purpose, the basic difference between them arises from the fact that they both are developed by keeping two totally different communities in mind." च्यायला, मग मी काय करू?
'तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू, इतक्यात म्हणे ती माझ्या कधी गावा येशील का तू?'

पुढचा स्पीकर हा सिस्टीम आर्किटेक्ट आहे, कसलं जीव तोडून बोलतोये! जणू तो ज्या प्रोजेक्ट बद्दल सांगतोये, तो प्रोजेक्ट म्हणजे त्याच्या एकुलत्या पोरीचं लग्न होतं! मला असं इतकं मी केलेल्या प्रोजेक्ट बद्दल ममत्व वाटलं का कधी? आठवत नाहीये.. जाम झोप येतेय, बापरे, हा माझ्या जांभयीचा आवाज गेला होता की काय? मी चपापतो!
'अपुल्याच मनातील स्वप्ने घेउन मिटावी मूठ. ही मूठ उघडण्यापूर्वी चल निघूया पाऊल म्हणते,'

मी ईंजिनिअर होण्याऐवजी दुसरं काही व्हायला पाहिजे होतं का? म्हणजे समथिंग जे करण्यासाठी मला स्वत:ला वेसण घालून 'हाईक्क..च्चक्क..च्चक्क..हाईक्क' करून दावणीला आणून बांधून ठेवावं लागलं नसतं, आणि जे आवडतं तेच जर काम ही असतं तर.! म्हणजे जे करतोये ते आवडत नाहीये असंही नाहीये अगदीच, पण हा कोर्स लय नकोसा झालाये, त्यात संदीपभाऊ आणि सलीलभाऊ, मला परत परत त्या कवितेच्या हिरव्यागार जंगलाकडे खेचून नेतायेत!
'परतीच्या वाटेवरति गुदमरून जड पायांनी, ओठावर शीळ दिवाणी बेफ़िकीर पण थरथरती..'

जंगलातल्या सावलीतून किलकिल्या डोळ्यांनी बाहेर प्रखर उजेडात बघितलं, तर जंगलाबाहेर मोकळ्या लॉनवर चकचकीत कढईत सिस्टीम-सी रटरटत शिजतेय, तो आर्किटेक्ट वधूपित्याचा फ़ेटा वगैरे बांधून, सर्वांना आग्रहाने ती चमचा चमचा वाढतोये 'एत स्माकलिक!'.. माझ्याच नावची रिकामी प्लेट आहे तिथे, आणि मी मात्र संदीप+सलील सोबत जंगलात सावलीत निवांत रमलोये!
'मित्रांशी हसतानाही, हे दु:ख चरचरत असते!'

मी तरी त्या एकाच कवितेचा एक साधा रसिक आहे, संदीपला तर अशा कितिकही कवितांना जन्म द्यावा लागतो. आणि पोटापाण्यासाठी तो ही एखादी नोकरी करत असेलच! कुठे? एक अंदाज, महाराष्ट्र बॅंकेत? कॅशियर? मग तो कसं करत असेल मॅनेज? मनात एखादी कविता बाळंत होत दुसऱ्या कवितेला जन्म देत असताना, दुपरी ३ ते ५ च्या फ़ायनल हिशेबात एक १००० ची नोट कमी भरली तर? काय होत असेल त्याचं? नोट.. जंगल.. कविता बाळंतीण.. शब्द.. हिशेब.. बॉस.. प्रोजेक्ट.. कढई.. सिस्टीम-सी.. चमचा..
हरे राम...!!!
रसिक श्रोतेहो (आणि वाचकहो), खरंच सांगतो,
'हे भलते अवघड असते'

आज कोर्स संपलाये, उद्यापासून पुन्हा ऑफ़िस! हुर्रे..!! ;-)

(MP3 of that poem can be downloaded from here => http://www.megaupload.com/?d=FP9AA01Y )

Friday, September 15, 2006

बी अ रिबेल!

5 प्रतिक्रिया
बाबा ठाकूर ने 'रंग दे' पाहून थिएटराबाहेर येतायेताच मला मोबाईलवरून इण्टरनॅशनल कॉल लावला होता, की 'रंग दे' मस्त आहे, आणि फ़्रेण्डशिप बद्दल आहे. मीही लय एक्साईट झालो ते ऐकून. 'डीसीएच' चा सिक्वेल की काय? वा! सही!! आणि काही दिवसांनी ह्याच अपेक्षा ठेवून तो पाहिल्याने, (आणि 'रंग दे' मध्ये भगतसिंग असेल याची पुसटशीही कल्पना नसल्याने), लगेचच मी बाबा ला मला 'रंग दे' कसा आवडला नाही याची भरभरून ई-मेल्स पाठवली.. ती पाहून बाबाला 'आपण चुकीच्या माणसाला फोन केला होता' असं वाटून गेलं असेल.! :(

पण आताशा 'रंग दे' पाहिल्याला काही महिने उलटल्यावर मला त्याची एक खुबी आवडायला लागलीये.. आणि आता परवा 'लगे रहो' पाहून आल्यावर तर ती आवडलेली खुबी अजून अधोरेखित (पहा आठवला की नाही बरोब्बर मराठी शब्द) झाली..

आपल्या भारतात, टू बी मोअर स्पेसिफ़िक, हिंदू धर्मात, आपण फ़ार पटकन एखाद्याच्या चांगल्या गुणांनी, किंवा शौर्याने इम्प्रेस होवून जातो. आणि त्या व्यक्तीला महान आणि पूज्य मानायला लागतो.. मग लगेच त्या व्यक्तीच्या तसबिरी, मूर्ती बनवून पूजेत ठेवायला आपल्याला वेळ लागत नाही.. तसं ते चांगलं आहे; भक्तीभाव, श्रद्धा, आदर, कृतज्ञता असणं.. पण ह्या प्रोसेस मध्ये आपण त्या व्यक्तीला महात्मा करून टाकलेलं असतं, आणि मग 'आम्ही काय बुवा, सामान्य माणसं' असं म्हणून त्या व्यक्तीचे गुण आपल्यात रुजवण्याचा प्रयत्नही केला जात नाही..

'रंग दे' ची ती आवडलेली खुबी अशी की त्या सिनेमाने भगतसिंग हा आपल्यासारखाच बेफ़िकीर, हॅपी-गो-लकी, (पण बराच जास्त) निडर तरूण होता हे दाखवलं. या मोजक्या गुणांव्यतिरिक्त त्यात असामान्य असं बाकी काहीही नव्हतं. आणि म्हणूनच त्याच्यासारखं बनणं आपल्यालाही तितकच शक्य आहे, आणि वेळ आली तर आपण तसं बनावंही.. त्याच्या फ़ोटोला फ़्रेम घातली की आपण त्याच्यासारखे बनू शकतो, ही शक्यताच आपण मनातून पुसून टाकलेली असते..

'रंग दे' वरूनच हिरानीला 'लगे रहो' ची कथा सुचली की काय असं मला वाटतं.. त्यानेही तेच केलं.. खादी, गांधी टोपी, एकवस्त्रं रहाणं, या सगळ्या महात्म्याला शोभेलशा सवयी जरी आपल्या अंगी नसल्या, तरी फ़क्त मोजक्या काही गुणांसहही 'गांधीगिरी' करणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवलं..

फ़ार बरं वाटलं.. 'कभी अलविदा' पाहून काळजीत पडलो होतो की अशा फ़ालतूपणाचा संदेश देणाऱ्या कथा ब्लॉकबस्टर म्हणून विकणाऱ्या, आणि नुकत्याच म्याड झालेल्या, निर्लज्ज करण जोहर चे सिनेमे पहात पुढची पिढी मोठी झाली, तर कसं होणार? हताशपणे एक सुविचार आठवून (मामा म्हणतो तशा) 'ईनएव्हिटेबल' साठी तयार झालोही होतो => 'नारळ आणि मुलगा कसा निघेल हे आधीच सांगणं कठीण आहे.' :(

कुणाचं आयुष्य कमी व्हावं असं देवाकडे का मागा? हो, पण शक्य असेल तर परमेश्वर त्या करण जोहर ला चित्रपट व्यवसायातून काढून कोळशाच्या दलालीवर पाठवो, आणि राजकुमार हिरानी ला उदंड आयुष्य देवो.! कारण तसं झालं, तरच 'पुढे अजून काय काय पहावं लागेल' याची चिंता करावी न लागता, 'पुढे काय पहायला मिळेल' याचं कुतुहल कायम वाढलेलं असेल!

Thursday, August 31, 2006

हृषीदा

6 प्रतिक्रिया
मला राज कपूर कधी आवडला नाही.. अपवाद फ़क्त 'अनाडी' चा.. काहीतरी गैरसमजातून नूतन आणि राज चं बिनसतं, तरी तो तिच्या वाढदिवसाला आलेला असतो, आणि ती जेव्हा 'हार्ट'च्या आकाराचा केक कापत असते, तेव्हा हा शेजारच्याला म्हणतो, "देखो कोई कैसे दिल पे छुरी चला रहा है".. अजुनही लक्षात राहिलेलं..

असंच उगाचच लक्षात राहिलेलं बरंच काही.. "कुर्ता इतना छोटा क्यूं पेहेनते हो?" वर रामप्रसाद दशरथप्रसाद ने मारलेली थाप.. अनुपमा मध्ये नायिका "धीरे धीरे मचल" गात असताना पियानो भोवती फ़िरणारा कॅमेरा..
पडद्यामागे येऊन उभ्या राहिलेल्या प्यारेमोहन ला "वहां खडे खडे क्या कर रहे हो?" विचारणारा वैतागलेला जिज्जाज्जी.. पोलिस स्टेशनावर भवानीप्रसाद शी मैत्री करू पहाणारा केष्टो.. प्यारेमोहन चा रुममेट झालेला त्याचा जेम्स.. हातात चपला घेऊन समुद्रकिनारी वाळूतून "जिंदगी कैसी है पहेली हाये" गात चाललेला आनंद.. त्याला "जहांपनाह, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर उपरवाले के हाथ मे बंधी हुवी है, कब कौन कहां कैसे उठेगा कोई नही बता सकता" सांगणारा मुरारीलाल.. मग "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये".. ते शेवटच्या सीन ला सगळं संपल्यावर अचानक ग्रामोफ़ोन मधून येणारी "बाबू मोशाय" ची जिवंत हाक..


हृषीदा बाकीच्या दिग्दर्शकांपेक्षा कसे वेगळे होते हे खोलात शिरून सांगणारे कितीतरी लेख सध्या इण्टरनेट वर येताहेत.. मी वेगळं काय लिहीणार? मागे २ ब्लॉग पूर्वी पंखे उतरवून झाल्याचं घोषित केलं खरं, पण हृषीदा गेल्याचं वाचून वाईट वाटलं.. खास आठवणीत ठेवायचा प्रयत्न न करताही, आणि कधी मुद्दाम विसरायचा प्रयत्न केला तरीही, आठवणीत रहाणारे त्यांचे चित्रपट, त्यातले प्रसंग, त्या व्यक्तिरेखा मनात अशाच कायम रेंगाळलेल्या रहातील हे नक्की..

Sunday, August 27, 2006

घरच्या घरी

0 प्रतिक्रिया
आमच्या इथे गणेशमूर्ती कुठुन मिळणार? बरं भारतयात्रा होते डिसेंबरात, तेव्हा कसलं लक्षात रहातयं की पुढच्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरात गणपती बसतील, तर चला तेव्हांसाठी आताच गणेशमूर्ती घेऊन जाऊया वगैरे! जुलैमध्ये ऑनलाईन-टॉय वर मूर्ती बनणे चालू झाल्याचे फोटो दिसले की आठवतं, "अरे यार..च्च..च्च..!".. आणि गणेशचतुर्थीच्या अदल्या दिवशी मग आपणही काहीतरी केलच पाहिजे ची खुमखुमी येते.

बॅचलर-लाईफ़ मध्ये असताना ही खुमखुमी आपोआप जिरून जायची, "जाने दो! नाहीतरी इथे काय करणार?" या सूज्ञ विचारासरशी.. मग "गणेशोत्सवातले १० दिवस बीअर-प्राशन बंद ठेवेन" या प्रतिज्ञेला पाळून गणेशभक्ती दाखवली जायची, तेवढी पुरेशी (किंबहुना ती ही जास्तच) वाटायची. ;-)

पण गेल्यावर्षीपासून गणेशोत्सवाचा रागरंगच बदललाये. लग्नानंतरचा तो पहिलाच सण होता, आणि ऍशला ईम्प्रेस करण्याच्या नादात घरीच गणेशमूर्ती बनवली होती.. मातीच्या गोळ्यापासून ट्राय केला, तर रहाडेच फ़ार झाले आणि वैताग वैताग.. मग साखरेत डालडा घालून पाहिलं, त्यालाही आकार देता येईना.. लास्ट ट्राय म्हणून ऍशने सुचवलेले ईन्ग्रॅडियण्ट्स घेतले = शेंगदाण्याचे कूट+गूळ+चांगले तूप एकत्र मळून.. जमलं!! :-) मूर्ती सुबक वगैरे नसली तरी निदान गणपतीची वाटत होती, अगदी मारुती नव्हता झाला. ;-) गणराय आले! १० दिवस छान गेले.. हौसेने इ-सकाळ आणि म.टा. ला फोटो पाठवले, आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी प्रकाशित ही केले. अनंतचतुर्दशीला मग गुपचुप एका कॅनॉलमध्ये कुणी पहात तर नाहीये नां, असं बघत विसर्जन केलेलं.. (गुपचुप यासाठी कारण डच लोक फ़ार संशयी. आता वाचलंत ना त्या विमानात "बिच्चाऱ्या" बारा भारतीयांनी मोबाईल चालू ठेवले तर आख्खं विमानच मागं फ़िरवलेलं! तर अतिशुद्ध पाण्यात गणपती विसर्जन करताना पकडलो गेलो असतो तर मामा/मामींना समजावणं महाकठीणच, वर अनंतचतुर्दशी च्या मुहुर्तावर गजाआड गेलो असतो!)

या वर्षी दुसऱ्या गावी रहातोये, आणि तसा आडोशाचा कॅनॉल इथे सापडलेला नाहीये, तर मूर्ती बनवायचा जास्त मूड नव्हता. पण ग्रुहमंत्र्यांचा मूड पाहून मीच पावित्रा बदलला. ;-) बरं आजची वेळ निघून गेली असती, आणि तिने गणेशोत्सव मिस करायला सुरुवात केली असती, तर मला पश्चातबुद्धी होवून फ़ायदा नव्हता. २ऱ्या/३ऱ्या दिवशी "बरं बाई करू साजरा गणेशोत्सव" असं म्हणून कसं चालेल? तर आजही सकाळी उठून (दुपारच्या आत सकाळच असते, अगदी ११:५९:५९ म्हणजेही सकाळच!) मूर्ती 'घडवलिये'. सोंडेला मूगडाळ, कानांना उडीदडाळ, वस्त्राला मसूरडाळ, जानव्याला तांदूळ, काजूचे दात, आणि बदामाचे तळहात, असाही प्रयत्न केलाय. याही वेळेस अपेक्षा फ़ार नव्हत्या, फ़क्त १० दिवस "मारुतीची तर पूजा केली नाही ना?" असा संशय आपल्यालाच नंतर येवू नये, इतकीच ती मूर्ती गणपतीची वाटली तरी चालेल, फ़क्त इतकीच माफ़क अपेक्षा होती.

गणराय आलेत.:-) (फ़ोटो लवकरच याच पोस्ट्ला रिएडिट करून टाकेन); अनंतचतुर्दशीला काय करायचं ते बघू नंतर.. दोघांच्या घरात तिसरं आल्यासारखं वाटतंय.. शेवटी काहीही झालं तरी मराठी माणूस एकवेळ दिवाळी न साजरी करता राहू शकेल, पण गणेशोत्सव तो साजरा करणारच! (बरं, माझं हे मत अजून दीड महिन्यांनीही पलटलेलं नसेल याची काहीही गॅरंटी देत नाहीये.;-) ..)

Thursday, August 17, 2006

पंखे उतरवून झाल्यावर...

8 प्रतिक्रिया
परवा निल्याला ऑर्कुट वर पिळत होतो, शाहरूखच्या कम्युनिटीला त्याने जॉईन न करण्यावरून, तर आठवलं की कधीकाळी मी ही शाहरूख चा पंखा होतो ते. दीवाना पाहिला फ़क्त ऋशी साठी, पुढे बाजीगर पाहूनही पकलो होतो, पण 'कभी हा कभी ना' मध्ये शाहरूख आवडून गेला होता. पुढे तो राज आणि राहूल च्या झेरॉक्स काढायला लागल्यावर तर त्याच्यासमोर लावलेला माझा "पंखा" अजून जोरात फ़िरत राहिला. मग त्याचे जुने, तेव्हा न आवडलेले सिनेमेही मी चवीने पाहिले, पाठ केले.

असं त्या आधीही झालं होतंच.. मला एकदा दिलीपकुमार चा ताप आला होता, तर मग संजीवकुमार चा. कधी तलत महमूद च्या गाण्यांचा, तर कधी रफ़ी च्या, तर बऱ्याचदा किशोर च्या. मग एकदा शोध लागला की सचिनदा बर्मन नी संगीत दिलेली गाणीच मला आवडतात.. पण 'आनंद' आणि 'हम दोनो' चं संगीत जयदेव नी दिलं होतं कळल्यावर मी जयदेव ची गाणी शोधली. आमच्या बालपणी "शोधणं" इतकं सोपं नव्हतं, कारण इण्टरनेट आणि गूगल अस्तित्वात नव्हते (निदान मझ्या आयुष्यात तरी ते आलेले नव्हते). बरं असं एका समोरून पंखे उचलून दुसऱ्यासमोर नेवून ठेवणं तिथेच थांबलं नाही, कारण नवा साक्षात्कार असा होता की जर गाण्याला अर्थ असला तरच ती आवडायची, आणि काही नवे कोरे पंखे 'साहिर लुधियानवी' आणि 'आनंद बक्षी' पुढेही लावले गेले. यथावकाश त्यांचा "बाप" म्हणाव्या अशा 'मिर्झा गालीब' चा "शोध" लागल्यावर त्यांच्यापुढेही एक मानाचा पंखा बसवून दिला होता.

मग अशा मनाला "झकास" मूड देणाऱ्या सेलिब्रिटीज शोधून काढायची आणि त्यांचा फ़ॅन व्हायची चटकच लागली.. त्या दरम्यान असे खूप पंखे ईन्स्टॉल केले गेले. :-)

केवळ "दो रास्ते" मधली एक भुमिका आवडली म्हणुन बलराज साहनी समोर, किंवा "कभी तनहाईयों में" ला संगीत दिलं म्हणून स्नेहल भाटकरांच्या पुढे एक, असे छोटे छोटे तर अगणित.

चित्रपट नायिकेसमोर पंखा लावताना मात्र एकावेळी एकीशीच एकनिष्ठ रहावं असं उगाचच वाटायचं. मग मधुबाले समोर एक अवाढव्य पंखा लावलेला असताना, वैजयंतीमालेपुढे दुसरा लावताना उगाचच अपराधी वाटलं होतं.! (तसं पाहिलं तर त्या १९९२ साली खऱ्या मधुबालेला जाऊन ४० वर्ष झाली होती, आणि खरी वैजयंती ४ नातवंडांची आजी झालेली होती.)

आश्चर्य म्हणजे अभ्यासाच्या धबाडक्यातही माझ्याकडून हे सारे पंखे लावले जात होते.

पण पुढे अचानक हे थांबलं.. नवे पंखे लावले गेले नाहीत.. जुने नकळत कधी काढून घेतले गेले मलाच कळलं नाही.. निल्या ला पिळताना जाणवलं मी शाहरूख पुढे लावलेला मोठ्ठा पंखा आता तिथे नाहीये, मग बाकीही बरेच पंखे गायब झाल्याचं दिसलं.. आता उगाच एखाददुसरा लतादीदी पुढे किंवा मधुबालेपुढे खडखडत डुगडुगत फ़िरता असेल, पण त्यातही पूर्वीचा जोश नाही..

असं का होतं? "ते वयच तसं असतं" का, सेलिब्रिटीज पुढे पंखे लावून फ़िदा व्हायचं? आणि मग ते वय गेल्यावर "स्व-अस्तित्वाची भावना" (सोप्या मराठीत सेल्फ़-कॉन्शस) वाढत जाते अन कुणा सेलिब्रिटीवर असं फ़िदा होणं / रहाणं वेडेपणाचं वाटायला लागतं?

Saturday, August 5, 2006

शुक्रवारी संध्याकाळी जी.सी.

0 प्रतिक्रिया
फ़्रायडे! आज लीना ऐवजी भाय ने फ़्रायडे च्या आनंदाचं ई-मेल पाठवलं होतं. मधे मंगळवारी ल्युव्हन ला ट्रिप झाल्याने तसा शुक्रवार लवकरच आल्यासारखा वाटला. पण आज 'दुकानात' कटकटी बऱ्याच होत्या. 'माईबाप' ने दुकान विकायला काढलयं.! अमेरिकेतल्या २ जायंट फ़ायनान्सिंग फ़र्म्स ने १० बिलियन डॉलर्स ना ८०% शेअर्स घेतलेत.! त्याचं काही टेंशन नाहीये, नव्या कंपनीच्या नावात पुढची ७ वर्षे जुन्या कंपनीचंही नाव राहील. ते रिझ्युमेवर दिसायला, आणि लोकांना सांगायला बरं दिसेल. ;-) ७ वर्षांनी ही कंपनी बंद पडली तरी गम नसेल.! मग दिवसभर त्याच्याच इन्फ़र्मेशन मिटिंगा, न्यूजलेटर्स, ई-मेल्स. त्यात एक डॉक्युमेण्ट लिहून संपवायचा होता, आणि दुसरा एक वाचून रिव्ह्यू करायचा. झालं सगळं साळंक्रुत एकदाचं. बरं ते जाऊ देत.. तो सारा काही ब्लॉगचा विषय नाही. तसा आजच्या ब्लॉगला विषयच नाहीये..

दुकानातून निघालो तर ऍश ने फोनवर सांगितलं, "सरप्राईज!, मी आज पियानोवर एक नवीन गाणं शिकलेयं, तू घरी आलास की वाजवून दाखवेन!" गाडीत विचार करत होतो मग की तिच्या २ जॉब मधली २ अठवड्यांची सुट्टी आहे तर असं काही छान करत रहायचं कसं सुचतं तिला, आणि करते